“राजदचा लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर बिहारमध्ये खऱ्या अर्थाने दिवाळी”: अमित शाह
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 05:52 IST2025-10-25T05:52:57+5:302025-10-25T05:52:57+5:30
अमित शाह यांनी म्हटले आहे की, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी त्या राज्याला पुन्हा योग्य मार्गावर आणण्यासाठी प्रयत्न केले.

“राजदचा लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर बिहारमध्ये खऱ्या अर्थाने दिवाळी”: अमित शाह
सिवान : बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये राजद व त्यांच्या आघाडीतील पक्षांचा लाजिरवाणा पराभव होणार असून तेव्हा बिहार खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी करेल, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी सांगितले.
सिवान जिल्ह्यात ते एका प्रचार सभेत म्हणाले की, कुख्यात गुंड व राजकारणी मोहम्मद शहाबुद्दीन यांचा मुलगा ओसामा शहाब यांना राजदने रघुनाथपूर मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. अशा लोकांना जनतेने पराभूत केले पाहिजे. लालूप्रसाद यादव आणि राबडी देवी यांच्या ‘जंगलराज’चा त्रास सिवानच्या लोकांनी किमान २० वर्षे सहन केला आहे. १४ नोव्हेंबर रोजी या निवडणुकांत राजदचा पराभव होणार, हे निश्चित आहे.
शाह यांनी सांगितले की, बिहारमधील इंडिया आघाडीमध्ये प्रचंड मतभेद आहेत. काँग्रेसने नुकतीच बिहारमध्ये ‘वोटर अधिकार यात्रा’ काढली. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणतात की, बिहारमधील घुसखोरांना तिथेच राहू द्यावे. मात्र, केंद्र सरकार बिहारमध्ये एकाही घुसखोराला राहू देणार नाही.’
‘नितीश कुमार यांच्यामुळे बिहारचा होतोय विकास’
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे की, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी त्या राज्याला पुन्हा योग्य मार्गावर आणण्यासाठी प्रयत्न केले, तर गेल्या १० वर्षांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केंद्र सरकारही बिहारला मदत करत आहे, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.