इंडिया आघाडीचे ठरले! तेजस्वी यादव बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार; सर्व पक्षांचा पाठिंबा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 05:23 IST2025-10-24T05:21:35+5:302025-10-24T05:23:23+5:30
बिहार विधानसभा निवडणूक २०२५: मुकेश साहनी यांना दोन उपमुख्यमंत्रींपैकी एक पद देणार

इंडिया आघाडीचे ठरले! तेजस्वी यादव बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार; सर्व पक्षांचा पाठिंबा
एस. पी. सिन्हा, लोकमत न्यूज नेटवर्क, पाटणा : महाआघाडीमधील दीर्घकाळ चाललेला तणाव अखेर मिटला आहे. सर्व सहयोगी पक्षांनी राजदचे नेते तेजस्वी यादव यांना बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून स्वीकारले आहे. गुरुवारी पाटणा येथील एका हॉटेलमध्ये घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी हा निर्णय जाहीर केला.
महाआघाडी सत्तेत आल्यास दोन उपमुख्यमंत्री असतील. त्यापैकी एक विकासशील इन्सान पार्टीचे प्रमुख मुकेश साहनी असतील, तर दुसरा उपमुख्यमंत्री मागासवर्गीय समाजातील एका अन्य नेत्याला बनवले जाईल. ते म्हणाले की, हा निर्णय काँग्रेसचे नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या संमतीने घेण्यात आला.
बिहारमधील निवडणूक तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाईल. जे युवक आहेत, त्यांच्यात मोठी क्षमता आहे आणि ज्यांचे भविष्य उज्ज्वल असते, त्यांच्यासोबत जनता उभी राहते. या पत्रकार परिषदेस राजदचे नेते तेजस्वी यादव, भाकपा-मालेचे महासचिव दीपांकर भट्टाचार्य, काँग्रेसचे प्रभारी कृष्णा अल्लावरू आणि इतर सहयोगी पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते.
एनडीएने सांगावे, त्यांचा मुख्यमंत्री कोण?
गेहलोत म्हणाले की, आम्ही मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर केला आहे; आता एनडीएने सांगावे की त्यांचा मुख्यमंत्री कोण आहे? देशात लोकशाही धोक्यात आहे. बिहारला बदलाची गरज आहे. आम्ही खूप विचारपूर्वक हा निर्णय घेतला आहे. राहुल गांधी यांच्या यात्रेत तेजस्वी यादव सहभागी झाले होते, त्यातून एकजुटीचा स्पष्ट संदेश देण्यात आला.
‘एनडीए’चे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार नितीश कुमारच
राजदचे नेते तेजस्वी यादव यांना महाआघाडीने बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून घोषित केल्यानंतर भाजपप्रणित एनडीए आघाडीने त्यावर जोरदार टीका केली आहे. भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटले की, बिहारमध्ये मुख्यमंत्रिपद रिक्त नाही; नितीश कुमार हेच आमचे नेते आहेत.