तेजस्वी मुख्य चेहरा, एक-दोन नव्हे तर एवढे उपमुख्यमंत्री...! बिहारमध्ये महाआघाडीनं तयार केला जागा वाटपाचा असा फॉर्म्यूला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 08:52 IST2025-10-09T08:51:33+5:302025-10-09T08:52:12+5:30
या फॉर्ल्यूल्यानुसार, राष्ट्रीय जनता दलाला (RJD) १२५, काँग्रेसला ५०-५५ आणि डाव्या पक्षांना २५ जागा मिळण्याची शक्यता आहे.

तेजस्वी मुख्य चेहरा, एक-दोन नव्हे तर एवढे उपमुख्यमंत्री...! बिहारमध्ये महाआघाडीनं तयार केला जागा वाटपाचा असा फॉर्म्यूला
बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, विरोधकांच्या महा आघाडीने जागावाटपासंदर्भात एक ढोबळ फॉर्म्यूला तयार केला आहे. यात सत्तेचे सामाजिक संतुलन साधण्याचा प्रयत्न केला आहे. यानुसार, सत्ता मिळाल्यास, तेजस्वी यादव मुख्यमंत्री, तसेच, दलित, मुस्लिम आणि अत्यंत मागासवर्गीय (EBC) समाजातील प्रत्येकी एक, असे तीन उपमुख्यमंत्री बनवले जातील, असे म्हणण्यात आले आहे.
या फॉर्ल्यूल्यानुसार, राष्ट्रीय जनता दलाला (RJD) १२५, काँग्रेसला ५०-५५ आणि डाव्या पक्षांना २५ जागा मिळण्याची शक्यता आहे. उर्वरित जागा मित्रपक्षांना दिल्या जातील. २४३ जागांच्या बिहार विधानसभेत १२३ हा बहुमताचा आकडा आहे. आरजेडीचे प्रवक्ते मृत्युंजय तिवारी यांनी, हा तेजस्वी यादव यांचा 'मास्टरस्ट्रोक' असल्याचे म्हटले आहे.
यासंदर्भात बोलताना मृत्युंजय तिवारी म्हणलाे, या फॉर्म्यूल्यामुळे आरजेडीची 'यादव-केंद्रित' प्रतिमा बदलेल आणि दलित, अति मागास आणि अल्पसंख्याक समाजाला सत्तेत महत्वाचे स्थान मिळेल. काँग्रेस नेत्यांनीही हा सामाजिक न्यायाच्या राजकारणाला व्यापक करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे.
महत्वाचे म्हणजे, अद्याप मित्र पक्षांनी तेजस्वी यांच्या नावावर औपचारिक मोहर लावलेली नाही. तेजस्वी यादव यांचा सामना एनडीएचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्याशी असेल. नीतीश सरकारमध्ये सध्या, सम्राट चौधरी (ओबीसी) आणि विजय कुमार सिन्हा (भूमिहार) हे दोन उपमुख्यमंत्री आहेत.
बिहारच्या राजकीय इतिहासात उपमुख्यमंत्री पद नेहमीच सामाजिक संतुलनासाठी वापरले गेले आहे. खरे तर निवडणुकीपूर्वीच तीन उपमुख्यमंत्र्यांची घोषणा करण्याची 'महाआघाडी'ची ही चाल असामान्य आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, या रचनेमुळे तेजस्वी यादव यांच्यावरील वंशवादाचा आरोप काहीसा मवळ होईल. तर दुसऱ्या बाजूला विरोधकांनी, ही योजना 'हवाई किल्ला' आणि केवळ मित्रपक्षांमधील बंडखोरी थांबवण्यासाठी असल्याचे टीकास्त्र सोडले आहे.