Maithili Thakur : "मला माझं यश दिसतंय, पण...", आघाडी घेताच लोकप्रिय गायिका मैथिली ठाकूरची पहिली प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 12:35 IST2025-11-14T12:33:58+5:302025-11-14T12:35:48+5:30
Bihar Election 2025 Result And Maithili Thakur : मैथिलीने तिच्या निवडणूक प्रचारादरम्यान खूप मेहनत घेतली. आता, तिच्या प्रयत्नांना यश येत असल्याचं आता दिसत आहे.

Maithili Thakur : "मला माझं यश दिसतंय, पण...", आघाडी घेताच लोकप्रिय गायिका मैथिली ठाकूरची पहिली प्रतिक्रिया
सध्या बिहार निवडणुकीच्या निकालांकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. यावेळी बिहारमध्ये कोणाचं सरकार स्थापन होणार हे जाणून घेण्यासाठी सर्वांनाच उत्सुकता आहे. भोजपुरी स्टार्सही निवडणूक रिंगणात उतरले आहेत. खेसारी लाल यादव, रितेश पांडे, मैथिली ठाकूर आणि पवन सिंह यांची पत्नी ज्योती सिंह यांसारखे सेलिब्रिटी यावेळी वेगवेगळ्या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.
लोकप्रिय गायिका मैथिली ठाकूर तिच्या लोकगीतांसाठी ओळखली जाते आणि बिहारमध्ये ती खूप प्रसिद्ध आहे. म्हणूनच जेव्हा मैथिलीने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तेव्हा ती सर्वसामान्य लोकांसाठी काय, काय करेल हे पाहण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे. भाजपाने मैथिली ठाकूरला दरभंगा लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या अलीनगर विधानसभा मतदारसंघात उमेदवारी दिली.
मैथिलीने तिच्या निवडणूक प्रचारादरम्यान खूप मेहनत घेतली. आता, तिच्या प्रयत्नांना यश येत असल्याचं आता दिसत आहे. आजच्या बिहार निवडणूक निकालांमधील सुरुवातीच्या ट्रेंडनुसार, मैथिली तिच्या अलीनगर मतदारसंघात आघाडीवर आहे. यावेळी, तिने आज तकशीही संवाद साधला आणि तिचा आनंद व्यक्त केला आहे.
पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या मैथिलीने निकाल पाहिल्यानंतर म्हटलं की, "मला माझं यश दिसत आहे. मी तुमच्या बातम्यांमधून ते पाहत आहे आणि काही काउंटींग एजंट मला सांगत आहेत की, मी अलीनगर मतदारसंघात आघाडीवर आहे. मी आता टीव्हीसमोर बसली आहे आणि मी गेल्या निवडणुकांमध्ये निकालांमध्ये चढ-उतार पाहिले आहेत. म्हणूनच जोपर्यंत मला विजयाचं सर्टिफिकेट मिळत नाही तोपर्यंत मी पूर्णपणे समाधानी होणार नाही."
मैथिली ठाकूरच्या उमेदवारीवरून पक्षातूनच नाराजी व्यक्त करण्यात आली होती. मैथिली ठाकूर हिच्या उमेदवारीला विरोधही करण्यात आला होता. मात्र असं असलं तरी मैथिली ठाकूरची उमेदवारी नंतर कायम ठेवण्यात आली. सुरुवातीला जे कल हाती आले, त्यानुसार अलीनगर मतदारसंघातून मैथिली ठाकूर आघाडीवर आहे.