Bihar Election 2025 Result: बहुचर्चित मैथिली ठाकूर आघाडीवर, ‘ती’ ६० टक्के मते ठरणार निर्णायक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 11:36 IST2025-11-14T11:34:50+5:302025-11-14T11:36:11+5:30
Bihar Election 2025 Result: ११ वाजेपर्यंत जे कल हाती आले, त्यानुसार मैथिली ठाकूर ७ हजारांपेक्षा अधिक मतांनी आघाडीवर आहे.

Bihar Election 2025 Result: बहुचर्चित मैथिली ठाकूर आघाडीवर, ‘ती’ ६० टक्के मते ठरणार निर्णायक
Bihar Election 2025 Result:बिहार विधानसभा निवडणूक २०२५ च्या महासंग्रामाचा निकाल लागत आहे. सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. सुरुवातीला पोस्टल व्होटिंगची मोजणी झाल्यानंतर ईव्हीएम मोजणी सुरू करण्यात आली. ११ वाजेपर्यंत जे कल हाती आले, त्यानुसार एनडीएला स्पष्ट बहुमत आले असून, महागठबंधन बऱ्याच पिछाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत अनेक जागा राष्ट्रीय पातळीवर चर्चेत होत्या. त्यापैकी एक म्हणजे प्रसिद्ध गायिका मैथिली ठाकूर. भाजपा उमेदवार असलेली मैथिली ठाकूर आघाडीवर असल्याचे दिसत आहे.
भाजपाने प्रसिद्धी गायिका मैथिली ठाकूर हिला दरभंगा लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या अलीनगर विधानसभा मतदारसंघात उमेदवारी दिली. परंतु, मैथिली ठाकूर हिच्या उमेदवारीवरून पक्षातूनच नाराजी व्यक्त करण्यात आली होती. मैथिली ठाकूर हिच्या उमेदवारीला विरोधही करण्यात आला होता. मात्र असे असले तरी मैथिली ठाकूरची उमेदवारी कायम ठेवण्यात आली. सुरुवातीला जे कल हाती आले, त्यानुसार अलीनगर मतदारसंघातून मैथिली ठाकूर आघाडीवर आहे.
‘ती’ ६० टक्के मते ठरणार निर्णायक
अलीनगरमध्ये मुख्य लढत भाजपा उमेदवार लोकगायिका मैथिली ठाकूर आणि राजद उमेदवार विनोद मिश्रा यांच्यात असल्याचे मानले जाते. इतर पक्षांबद्दल बोलायचे झाले तर प्रशांत किशोर यांच्या जनसुराज्य पक्षाने अलीनगरमधून बिप्लब कुमार चौधरी यांना उमेदवारी दिली आहे. अलीनगरमध्ये एकूण १२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे या ठिकाणची लढत ही अत्यंत चुरशीची होऊ शकते, असे म्हटले जात आहे. अलीनगर मतदारसंघात ६०.१८ टक्के मतदार झाले होते. ११ वाजेपर्यंत मैथिली ठाकूर १९ हजार ०१८ मतांनी आघाडीवर आहे. तर राजद उमेदावर विनोद मिश्रा यांना ११ हजार १८५ मते मिळाली आहे.
दरम्यान, ११ वाजेपर्यंत जे कल हाती आले, त्यानुसार, एनडीएत घटक पक्ष असलेल्या भाजपाचे ८५ उमेदवार आघाडीवर आहेत. तर, मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दल युनायडेट पक्षाचे ७७ उमेदवार आघाडीवर आहेत. महागठबंधनचे घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दल पक्षाचे ४० उमेदवार आघाडीवर आहेत. तर काँग्रेसचे ७ उमेदवार आघाडीवर आहेत. तर ३३ पेक्षा अधिक जागांवर अपक्ष आघाडीवर आहेत.