Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 13:59 IST2025-11-14T13:53:39+5:302025-11-14T13:59:52+5:30
Ajit Pawar NCP In Bihar Election 2025 Result: बिहार विधानसभा निवडणुकीत सुरुवातीच्या कलांमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी आघाडीही घेतली नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
Ajit Pawar NCP In Bihar Election 2025 Result: बिहार विधानसभा निवडणूक २०२५ च्या महासंग्रामाचा निकाल लागत आहे. सुरुवातीला जे कल हाती आले, त्यानुसार एनडीएची वाटचाल आता २०० जागांच्या दिशेने सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. तर महागठबंधन अवघ्या ३९ जागांवर आघाडीवर असल्याचे दिसत आहे. यातच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने बिहार निवडणुकीत नशीब आजमवण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, अजितदादांच्या एकाही उमेदवाराला दखलपात्रही कामगिरी करता आलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार गटाच्या सर्वच उमेदवारांचे डिपॉझिटही वाचणार नाही, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
शरद पवार यांच्या नेतृत्त्वाखाली असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने देशभरात बऱ्यापैकी हातपाय पसरले होते. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट झाल्यानंतर पक्षाने राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावला. त्यामुळे अजित पवार यांनी हा राष्ट्रीय दर्जा परत मिळवण्याच्या आशेने बिहारच्या निवडणुकीत उमेदवार उतरवले होते. परंतु, या सर्व उमेदवारांनी पार निराशा केल्याचे दिसत आहे. दुपारी १ वाजेपर्यंत जे कल हाती आले, ते पाहता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकही उमेदवाराला आघाडीही घेता आलेली नाही.
बिहार निवडणुकीत अजित पवारांचे १५ उमेदवार रिंगणात
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या एकाही उमेदवाराला जिंकणे तर दूर सोडा पण आघाडीही घेता आलेली नाही. १५ पैकी १३ जागांवर अजित पवारांच्या पक्षाचे उमेदवार मोठ्या फरकाने पिछाडीवर आहेत. अजित पवारांच्या या उमेदवारांना अद्याप ५०० मतांचा टप्पा ओलांडता आलेला नाही. हे चित्र कायम राहिल्यास बिहारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, १ वाजेपर्यंत जे कल हाती आले, त्यानुसार, एनडीएत घटक पक्ष असलेल्या भाजपाचे ९१ उमेदवार आघाडीवर आहेत. तर, मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दल युनायडेट पक्षाचे ८१ उमेदवार आघाडीवर आहेत. महागठबंधनचे घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दल पक्षाचे २६ उमेदवार आघाडीवर आहेत. तर काँग्रेसचे ४ उमेदवार आघाडीवर आहेत.