बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 09:51 IST2025-11-07T09:50:29+5:302025-11-07T09:51:11+5:30
Bihar Election 2025: मतदारांचा हा प्रचंड उत्साह राज्यातील राजकीय पक्षांसाठी, विशेषतः सत्ताधारी 'एनडीए'साठी, चिंतेचा विषय ठरत आहे.

बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात मतदारांनी सर्व विक्रम मोडून काढले आहेत. १८ जिल्ह्यांमधील १२१ विधानसभा मतदारसंघांमध्ये विक्रमी ६४.६९ टक्के मतदान झाले आहे, जे मागील निवडणुकीपेक्षा तब्बल ८.५ टक्क्यांनी अधिक आहे. मतदारांचा हा प्रचंड उत्साह राज्यातील राजकीय पक्षांसाठी, विशेषतः सत्ताधारी 'एनडीए'साठी, चिंतेचा विषय ठरत आहे.
बिहारच्या निवडणूक इतिहासातील आकडेवारीनुसार, राज्यात जेव्हा जेव्हा मतदानाच्या टक्क्यात ५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे, तेव्हा तेव्हा सत्तापरिवर्तन झाले आहे. वाढलेले मतदान हे सामान्यतः 'सत्ताविरोधी लाट' (Anti-incumbency) दर्शवते आणि जनतेला राजकीय बदल हवा आहे, असे मानले जाते. १९६७, १९८० आणि १९९० च्या निवडणुकीत ५ टक्क्यांहून अधिक मतदान वाढल्याने सत्ताधारी पक्षाला पायउतार व्हावे लागले होते.
२०२० च्या निवडणुकीत या १२१ जागांवर 'महाआघाडी'ने ६१ जागा जिंकल्या होत्या, तर 'एनडीए'ला ५९ जागा मिळाल्या होत्या. यंदा 'एनडीए'मध्ये चिराग पासवान आणि उपेंद्र कुशवाहा यांचा समावेश झाला आहे, तर मुकेश सहनी 'महाआघाडी'सोबत आहेत, ज्यामुळे जुनी समीकरणे बदलली आहेत.
पहिल्या टप्प्यात मतदानात झालेली ही ८.५ टक्क्यांची वाढ विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील 'एनडीए' सरकारसाठी धोक्याची घंटा ठरते की, 'महाआघाडी'साठी ही वाढ अनुकूल ठरते, याकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. या मतदान वाढीमुळे दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराला दोन्ही बाजूंकडून मोठी ताकद लावली जाणार आहे.
अनेक ठिकाणी मतदारांना रोखले...
बिहारमध्ये राजदची मतपेढी असलेल्या भागात अनेक ठिकाणी पोलीस प्रशासनाचा वापर करून मतदारांना मतदान केंद्रावर जाण्यापासून रोखले जात असल्याचे आरोप केले जात आहेत. याबाबतचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.