महागठबंधन नव्हे महालठबंधन, NDA मोडणार सर्व विक्रम; PM मोदींनी फुंकले प्रचाराचे रणशिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 06:00 IST2025-10-25T05:59:55+5:302025-10-25T06:00:29+5:30
पंतप्रधान म्हणाले की, २०१४ साली एनडीएचे सरकार केंद्रात येताच बिहारला सरकारने केलेली मदत आधीच्या सरकारच्या तुलनेत तिप्पट आहे. बिहार आता बदलला आहे.

महागठबंधन नव्हे महालठबंधन, NDA मोडणार सर्व विक्रम; PM मोदींनी फुंकले प्रचाराचे रणशिंग
समस्तीपूर/बेगुसराय: बिहारच्या आगामी विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए विजयाचे आधीचे सर्व विक्रम मोडीत काढून प्रचंड यश मिळविणार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी समस्तीपूर व बेगुसराय जिल्ह्यात घेतलेल्या दोन जाहीर सभांमध्ये सांगितले. इंडिया आघाडी ही महागठबंधन नसून महालठबंधन म्हणजे ज्यात लोक एकमेकांना लाठ्याकाठ्यांनी बदडतात असे गठबंधन आहे, असे सांगून मोदी यांनी त्यांची खिल्ली उडविली.
ते म्हणाले की, इंडिया आघाडीचे प्रमुख घटक पक्ष असलेल्या राजद व काँग्रेसचे नेते सर्वाधिक भ्रष्ट असून त्यातील काही जणांची जामिनावर सुटका झाली आहे. सत्तेपासून अनेक दशके दूर राहिल्यानंतरही त्यांची मूळ प्रवृत्ती कायम आहे. ते झारखंड मुक्ती मोर्चासारख्या मित्रपक्षांना अपमानित करतात. विकासशील इन्सान पार्टीला फसवितात. या पक्षाला अपेक्षित असलेल्या जागा न देता त्या पक्षाचे संस्थापक मुकेश सहनी यांना उपमुख्यमंत्रिपदाचे आश्वासन देण्यात आले आहे.
‘सीताराम केसरी यांचा काँग्रेसने अवमान केला’
मोदी यांनी आरोप केला की, काँग्रेसचे माजी अध्यक्ष सीताराम केसरी यांना त्या पक्षाच्या नेतृत्वाने अपमानास्पद वागणूक दिली. बिहारचा अभिमान असलेल्या सीताराम केसरी या मागासवर्गीय नेत्याला परिवाराने (नेहरू-गांधी घराणे) पक्षाध्यक्षपदावरून हटवले होते.
बिहार आता बदललाय
पंतप्रधान म्हणाले की, २०१४ साली एनडीएचे सरकार केंद्रात येताच बिहारला सरकारने केलेली मदत आधीच्या सरकारच्या तुलनेत तिप्पट आहे. बिहार आता बदलला आहे. तो पूर्वी इतर राज्यांवर अवलंबून होता.
‘...तू चूप बैठ, वरना भाजपा आ जायेगी’; एआय फोटो चर्चेत
सोशल मीडियावर अनेक मजेशीर पोस्ट शेअर केल्या जात आहेत. यात व्हायरल झालेला एक फोटो प्रचंड चर्चेत असून यात ‘अब्दुल, तू चूप बैठक वरना भाजपा आ जायेगी’, असे लिहिले आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, ‘२ टक्केवाला उपमुख्यमंत्री आणि १३ टक्केवाला मुख्यमंत्री, १८ टक्केवाला दरी बिछावन मंत्री... आम्ही काही सांगायला जाऊ तर म्हणतील, अब्दुल तू गप्प बस, नाहीतर भाजप येईल.’
राजदबरोबर हातमिळवणी ही चूक : नितीश कुमार
लालू प्रसाद यांचे नाव न घेता टीका करताना बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले, “त्यांच्या सवयी आजही बदललेल्या नाहीत. आधी पत्नीला पुढे केले, आता मुलगा-मुलींना प्रोत्साहन देत आहेत.” त्यांच्या या वक्तव्याने राजद नेते तेजस्वी यादव व पाटलीपुत्रच्या खासदार मीसा भारती यांचा थेट उल्लेख न करता त्यांच्यावर टीका झाली. नितीश कुमार पुढे म्हणाले, “मी थोड्या काळासाठी त्यांच्या पक्षासोबत आघाडी केली होती, पण लवकरच मला ते चूक असल्याचे लक्षात आले. मी ज्या आघाडीचा सुरुवातीपासून भाग आहे, त्याच आघाडीत मी अधिक सक्षम आहे.”
इंडिया आघाडीसारखी एनडीएची दुभंगलेली अवस्था झालेली नाही. एनडीए एकसंध असून आम्हालाच बिहारमध्ये पुन्हा विजय मिळणार आहे. गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र व हरियाणातील निवडणुकांमध्येही आमच्या सरकारने सर्व आधीचे विक्रम मोडले. त्याचीच पुनरावृत्ती आता बिहारच्या निवडणुकांमध्येही होईल. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान (समस्तीपूरमधील सभेत)