मोदी-नितीश फक्त सत्तेसाठी एकत्र; मल्लिकार्जुन खरगेंचा BJP-JDU युतीवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2025 17:22 IST2025-04-20T17:22:14+5:302025-04-20T17:22:50+5:30

बिहारमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होणार आहे.

Bihar Election 2025: Modi-Nitish are together only for power; Mallikarjun Kharge targets BJP-JDU alliance | मोदी-नितीश फक्त सत्तेसाठी एकत्र; मल्लिकार्जुन खरगेंचा BJP-JDU युतीवर निशाणा

मोदी-नितीश फक्त सत्तेसाठी एकत्र; मल्लिकार्जुन खरगेंचा BJP-JDU युतीवर निशाणा

Bihar Election 2025:बिहारमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजपसह काँग्रेसने राज्यात विविध ठिकाणी प्रचारसभा सुरू केल्या आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बक्सरमधील एका सभेला संबोधित करताना मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या जेडीयू आणि भाजप युतीला संधीसाधू म्हटले. 

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बक्सर येथील दलसागर स्टेडियमवर आयोजित 'जय बापू, जय भीम, जय संविधान' रॅलीला संबोधित केले. यावेळी त्यांनी नितीश कुमार आणि भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) युतीला संधीसाधू म्हटले. नॅशनल हेराल्ड प्रकरणात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाहा आणि आरएसएसवर धमकीचे राजकारण केल्याचा आरोपही केला.

खरगे पुढे म्हणाले, बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार फक्त सत्तेसाठी वारंवार बाजू बदलतात. नितीश यांनी महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या विचारधारेशी व्यक्तीशी युती केली आहे. बिहारच्या जनतेने मुख्यमंत्र्यांना विचारावे की, 2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याला दिलेल्या 1.25 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजचे काय झाले? आता बिहारमधून एनडीए सरकार गेलं पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.

नॅशनल हेराल्ड प्रकरणावर खरगे काय म्हणाले?
मल्लिकार्जुन खरगेंनी यावेळी नॅशनल हेराल्ड प्रकरणावरही भाष्य केले. ते म्हणाले की, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याविरुद्ध ईडीकडून आरोपपत्र दाखल करून भाजप सूडाचे राजकारण करत आहे. पण, आम्ही घाबरणार नाही. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ दुर्बल घटकांच्या विरोधात असल्याचा आरोप मल्लिकार्जुन खरगे यांनी केला.

वक्फवर खरगे काय म्हणाले?
भाजपचे लोक धर्माच्या नावाखाली लोकांना फूट पाडतात. हे लोक महिला, गरीब आणि मागासलेल्यांच्या हिताचा विचार करू शकत नाहीत. भाजप आणि संघाने जाणूनबुजून वक्फ दुरुस्ती विधेयक आणले आहे. याद्वारे दोन समुदायांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

Web Title: Bihar Election 2025: Modi-Nitish are together only for power; Mallikarjun Kharge targets BJP-JDU alliance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.