आधी मंत्र्यावर हल्ला, आता पोलिस अधिकाऱ्याला मारहाण; निवडणुकीपूर्वी बिहारमध्ये चाललंय काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 16:10 IST2025-08-27T16:08:12+5:302025-08-27T16:10:45+5:30
या वर्षाच्या अखेरीस बिहारमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे.

आधी मंत्र्यावर हल्ला, आता पोलिस अधिकाऱ्याला मारहाण; निवडणुकीपूर्वी बिहारमध्ये चाललंय काय?
Bihar Election 2025: या वर्षाच्या अखेरीस बिहारध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. या निवडणुकीपूर्वी बिहार पुन्हा एकदा आपल्या जुन्या स्वरुपात येतोय का? अशी चर्चा सुरू झाली आहे. याचे कारण म्हणजे, आज सकाळी मंत्री श्रवण कुमार यांना हिलसा गावात स्थानिकांच्या रोषाचा सामना करावा लागला. स्थानिकांनी मंत्र्याच्या गाडीवर हल्ला चढवला अन् त्यांना पळवून लावले. दुसरीकडे, पाटण्यातील गरदानीबागमध्ये एका शाळकरी मुलीने केलेल्या आत्मदहनाच्या प्रयत्नाची चौकशी करण्यासाठी आलेल्या एसएचओला लोकांनी मारहाण केली.
एसएचओला मारहाण
पाटण्याच्या गरदानीबागमध्ये एका विद्यार्थिनीने शाळेत स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला होता. अल्पवयीन मुलगी अमला टोला कन्या शाळेत शिकत होती. मुलीला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर लोकांनी गरदानीबाग कन्या शाळेत गोंधळ घातला. पुढे विद्यार्थिनीला उपचारासाठी पीएमसीएचमध्ये दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलिस शाळेत पोहोचले होते. शाळेबाहेर जमलेल्या जमावाने इमारतीचे मुख्य गेट बंद केले आणि पोलिसांवर हल्ला केला.
VIDEO | Nalanda: Bihar’s Rural Development Minister Shravan Kumar and Hilsa MLA Krishna Murari were attacked by angry villagers during a visit to Nalanda. One security personnel was injured and hospitalised. Authorities have launched an investigation, and security has been… pic.twitter.com/uYVPydzu3K
— Press Trust of India (@PTI_News) August 27, 2025
मंत्री श्रवण कुमार यांच्यावर हल्ला
बुधवारी सकाळी नालंदा जिल्ह्यातील हिलसा येथे रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्या नऊ जणांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी बिहार सरकारचे मंत्री श्रवण कुमार पोहोचले होते. गावकऱ्यांचा आरोप आहे की, त्यांना त्यांच्या समस्या मंत्र्यांसमोर मांडायच्या होत्या आणि नुकसानभरपाईची मागणी करायची होती. परंतु त्यांचे ऐकून घेण्याऐवजी मंत्री श्रवण कुमार तेथून निघून जाऊ लागले. यामुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी ताफ्यावर हल्ला केला आणि त्यांना गावातून हाकलून लावले.