'तुम्ही सांगा फक्त, नरेंद्र मोदी मतांसाठी स्टेजवर नाचायलाही तयार होतील,' राहुल गांधींची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 16:21 IST2025-10-29T16:20:17+5:302025-10-29T16:21:31+5:30
Rahul Gandhi Muzaffarpur rally: 'महाराष्ट्र, हरयाणात निवडणुका चोरल्या, आता बिहारमध्येही प्रयत्न सुरू आहेत.'

'तुम्ही सांगा फक्त, नरेंद्र मोदी मतांसाठी स्टेजवर नाचायलाही तयार होतील,' राहुल गांधींची टीका
Bihar Election 2025 : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज बिहारच्या मुजफ्फरपूर येथे तेजस्वी यादव यांच्या सोबत निवडणूक प्रचारसभा घेतली. या सभेतून त्यांनी मुख्यमंत्री नीतीश कुमार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोघांवरही जोरदार टीका केली.
मोदींना फक्त तुमची मतं पाहिजे
राहुल गांधींनी दिल्लीतील छठ पूजेच्या आयोजनावरुन मोदींना लक्ष्य केले. 'मोदींसाठी यमुनेजवळ वेगळे स्वच्छ पाणी आणले गेले, कारण तिथे नदीत घाण पाणी होते. मोदींना यमुनेशी नाही, फक्त तुमच्या मतांशी घेणेघेणे आहे. मतांसाठी तुम्ही सांगाल, तर स्टेजवर नाचतीलसुद्धा! निवडणुकीपूर्वी तुम्ही मोदींकडून काहीही करुन घ्या, ते तयार होती. पण, निवडणुकीनंतर तुम्हाला दिसणार नाहीत.'
#BiharElection2025 | Muzaffarpur, Bihar: Lok Sabha LoP Rahul Gandhi says, "... There's no Yamuna there; there's a pond there. Narendra Modi went to bathe in his swimming pool. He has nothing to do with the Yamuna. He has nothing to do with Chhath Puja. He just wants your vote. If… pic.twitter.com/rCR5jHxhyH
— ANI (@ANI) October 29, 2025
महाराष्ट्रात, हरियाणात निवडणुका चोरल्या
राहुल गांधींनी पुन्हा एकदा वोट चोरीचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, 'भाजपने महाराष्ट्र आणि हरियाणात निवडणुका चोरल्या. आता बिहारमध्येही ते प्रयत्न करत आहेत. SIR म्हणजेच ‘Steal, Intimidate, Rule’, हीच त्यांची नीती आहे. आपण एकत्र राहून हे थांबवले पाहिजे,' अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
नितीश कुमारांचे रिमोट कंट्रोल भाजपच्या हातात
मुख्यमंत्र्यांवर टीका करताना राहुल म्हणाले, 'नितीश कुमार गेली 20 वर्षे सत्तेत आहेत, पण बिहारच्या युवकांसाठी काहीही केले नाही. बिहारमध्ये बिहारींचे भविष्यच नाही. आज नितीश कुमारांचे रिमोट कंट्रोल भाजपच्या हातात आहे. तीन-चार लोक संपूर्ण राज्य चालवतात आणि सामाजिक न्यायाशी त्यांना काही देणेघेणे नाही. मी लोकसभेत पंतप्रधानांना सांगितले की, जातीय जनगणना करा, पण त्यांनी एक शब्दही बोलला नाही. कारण भाजप सामाजिक न्यायाच्या विरोधात आहे.'
बिहारच्या युवकांना राज्यात संधी मिळत नाही
राहुल गांधींनी बिहारच्या तरुणांच्या परिस्थितीवर भाष्य करताना म्हटले, 'मी जिथे जातो, तिथे मला बिहारचे तरुण भेटतात. आपल्याच राज्यात त्यांना काम मिळत नाही. शिक्षण, आरोग्य आणि रोजगार या तिन्ही क्षेत्रात नितीश सरकार अपयशी ठरले आहे. आज तुमच्या फोनच्या मागे ‘Made in China’ लिहिले असते. असे का? नोटबंदी आणि GST मुळे लहान उद्योग उद्ध्वस्त झाले. आमचं स्वप्न आहे, मोबाईल, कपडे सगळ्यांवर ‘Made in Bihar’ लिहिले पाहिजे. आम्हाला असा बिहार हवा, जिथे तरुणांना आपल्या भूमीत संधी मिळेल. '
बिहार मागे नाही, फक्त संधी हवी
शेवटी राहुल गांधी म्हणाले, 'बिहारचे लोक कुणापेक्षा कमी नाहीत. त्यांनी भारतात आणि परदेशात विकास घडवला आहे. आम्ही असा बिहार तयार करू, जिथे इतर राज्यांतील लोक कामासाठी येतील. तेजस्वी बिहारला पुढे नेण्यास इच्छुक आहेत, आणि आम्ही त्यांच्या सोबत आहोत. आम्हाला फक्त एक संधी हवी आहे,' असे आवाहनही त्यांनी यावेली केले.