निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 09:57 IST2025-10-29T09:55:44+5:302025-10-29T09:57:07+5:30
Bihar Election 2025, Eknath Shinde: मुख्यमंत्री पदावर NDA मध्ये संभ्रम; मुकेश सहनी यांनी दिला फडणवीस-शिंदे यांच्या सत्तास्थापनेचा दाखला, JDU कडून जोरदार प्रत्युत्तर

निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीचा प्रचार हळूहळू रंगत असताना, अचानक महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाची चर्चा बिहारच्या राजकारणात सुरू झाली आहे. मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरून राष्ट्रीय लोकशाही आघाडीवर निशाणा साधण्यासाठी महाआघाडीच्या नेत्यांकडून शिंदे यांच्या नावाची उपरोधिकपणे चर्चा केली जात आहे.
महाआघाडीचे उपमुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आणि व्हीआयपी प्रमुख मुकेश सहनी यांनी भाजप प्रणित एनडीएवर टीका करताना थेट महाराष्ट्राचा संदर्भ दिला. सहनी म्हणाले, "आम्ही तर खूप पुढे आहोत. आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या नावांची घोषणा करून संकल्पपत्र देखील जारी केले आहे. मात्र, एनडीएमध्ये अजून मुख्यमंत्री कोण असेल, हेच ठरलेले नाही."
शिंदे-फडणवीस यांचे उदाहरण
NDA वर हल्ला चढवताना सहनी यांनी महाराष्ट्रातील सत्तांतराचा दाखला दिला. ते म्हणाले, "ते म्हणतात की फक्त नीतीश कुमार यांच्या नावावर निवडणूक लढवणार, पण मुख्यमंत्री कोण होणार हे आमदार ठरवतील. जसे महाराष्ट्रात, शिंदेंच्या नावावर निवडणूक लढवली, पण निवडणुकीनंतर भाजपच्या फडणवीस यांना मुख्यमंत्री बनवले गेले." असे सांगत सहनी यांनी भाजप आपल्या सहयोगी पक्षाच्या नेत्याला मुख्यमंत्री पदापासून दूर ठेवू शकते, असा दावा करत नितीशकुमार यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
JDU चा पलटवार
या टीकेला जनता दल युनायटेड पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष संजय झा यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. झा यांनी स्पष्ट केले की, बिहारमध्ये सध्याचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्या नेतृत्वाखालीच निवडणूक लढवली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह शीर्ष नेतृत्वाने हे वारंवार स्पष्ट केले आहे. त्यामुळे निवडणुकीनंतरही नीतीश कुमार हेच मुख्यमंत्री असतील, यात कोणतीही शंका नाही. अन्य राज्यांमध्ये काय झाले, याच्याशी बिहारच्या राजकारणाचा कोणताही संबंध नाही, असे सांगत त्यांनी महाराष्ट्राच्या संदर्भाला फेटाळून लावले.