"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 15:49 IST2025-11-06T15:48:10+5:302025-11-06T15:49:44+5:30
दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बिहारमधील बेतिया येथे एनडीएच्या जनसभेतून विरोधकांवर थेट हल्ला चढवला. यावेळी त्यांनी एडीएच्या विजयाचा दावा केला.

"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
बिहार विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. निवडणुकीच्या मैदानात असलेल्या सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. आज पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडत आहे. दुसरा टप्पा ११ तारखेला आहे. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बिहारमधील बेतिया येथे एनडीएच्या जनसभेतून विरोधकांवर थेट हल्ला चढवला. यावेळी त्यांनी एडीएच्या विजयाचा दावा केला.
शाह म्हणाले, “14 तारखेला मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर सकाळी 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा 'सुपडा' साफ होईल. ” भाषणाच्या प्रारंभी त्यांनी महर्षी वाल्मीकींच्या तपोभूमीचा उल्लेख करत, जर चुकून महाअघाडी सत्तेवर आली, तर चंपारणचे ‘चंबळ’ होईल आणि बिहार पुन्हा जंगलराजच्या छायेखाली जाईल. अशा परिस्थितीपासून वाचण्यासाठी ‘कमळछाप’चे बटन दाबा, असे आवाहनही त्यांनी जनतेला केले.
शाह पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वात एनडीए पुन्हा एक सरकार बनवत आहे. अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या बांधकामात पूर्वी इंग्रज, काँग्रेस आणि लालू यांच्यामुळे विलंब झाला, पण मोदींनी भव्य मंदिर उभारले. तसेच, बिहारमधील सीतामढीत माता सीता यांचे भव्य मंदिर बांधले जात आहे. ज्या दिवशी मंदिर पूर्ण होईल, त्याच दिवशी अयोध्येतून सीतामढीसाठी वंदे भारत ट्रेन सुरू केली जाईल, असे आश्वासनही शाह यांनी यावेळी दिले.
दरम्यान शाह यांनी घुसखोरीचा मुद्दाही प्रखरतेने उपस्थित केला. “घुसखोरांना देशाबाहेर काढायला हवे की नको?” असा प्रश्न केला असता, जनतेमधून होकाराचा स्वर आला. यावर शाह यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला, “राहुल बाबांनी घुसखोरांना वाचवण्यासाठी यात्रा काढली होती. त्यांनीही कितीही यात्रा काढाव्यात, पण आम्ही प्रत्येक घुसखोराला देशाबाहेर काढणारच." एवढेच नाही तर, बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? हे बांगलादेशी घुसखोर ठरवणार का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.