केंद्रीय मंत्र्यांच्या भाच्यांनी एकमेकांवर केला गोळीबार, एकाचा मृत्यू, दुसऱ्या भाच्यासह बहीण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 15:46 IST2025-03-20T15:32:46+5:302025-03-20T15:46:26+5:30
Bihar Crime News: मागच्या काही दिवसांपासून बिहारमध्ये गुन्हेगारीच्या वाढत्या घटना समोर येत असतानाच नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये मंत्री असलेल्या नित्यानंद राय यांच्या बहिणीच्या कुटुंबात धक्कादायक घटना घडली आहे.

केंद्रीय मंत्र्यांच्या भाच्यांनी एकमेकांवर केला गोळीबार, एकाचा मृत्यू, दुसऱ्या भाच्यासह बहीण जखमी
मागच्या काही दिवसांपासून बिहारमध्येगुन्हेगारीच्या वाढत्या घटना समोर येत असतानाच नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये मंत्री असलेल्या नित्यानंद राय यांच्या बहिणीच्या कुटुंबात धक्कादायक घटना घडली आहे. नित्यानंद राय यांच्या भाच्यांनी किरकोळ कारणांवरून झालेल्या भांडणानंतर एकमेकांवर गोळीबार केला. या गोळीबारात राय यांच्या एका भाच्याचा मृत्यू झाला असून, दुसरा भाचा आणि बहीण जखमी झाले आहेत.
याबाबत अधिक माहिती देताना नवगछिया येथील पोलिसांनी सांगितले की, आपपसातील वादामुळे दोन्ही भावांनी एकमेकांवर गोळीबार केला. पाण्यावरून दोन्ही भावांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर विश्वजित आणि जयजीत यांनी एकमेकांवर गोळीबार केला. यात विश्वजित आणि जयजीतसह त्यांची आई हिना देवी ही जखमी झाली. पैकी विश्वजित याचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. तर जयजीत आणि हिना देवी यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विश्वजित आणि जयजीत हे केंद्रीय मंत्री नित्यानंतर राय यांचे भाचे आहेत. तर हिना देवी ही राय यांची बहीण आहे.
मृत विश्वजित आणि त्याचा भाऊ जयजीत यादव हे नवगछिगा येथील जगतपूर गावामध्ये एकाच कुटुंबामध्ये राहत होते. तसेच दोघेही शेती करून आपला उदरनिर्वाह चालवायचे. दरम्यान, नळाच्या पाण्यावरून दोघांमध्ये वाद झालला. त्यानंतर त्यांनी एकमेकांना धक्काबुक्की केली. यादरम्यान, जयजीत याने विश्वजितवर गोळीबार केला. तर विश्वजितनेही जयजीतवर गोळ्या झाडल्या. यावेळी या दोघांची आई हिना देवी हिलाही गोळी लागून ती जखमी झाली. या तिघांनाही रुग्णालयात नेत असताना विश्वजीत याचा वाटेतच मृत्यू झाला. तर जयजीत हा उपचार घेत आहे.
भाजपा आमदार डॉ. एन. के. यादव यांच्या रुग्णालयात हिना देवी आणि जयजीत यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर पोलिसांनी मृत विश्वजित याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.