३ वर्षाच्या मुलीची हत्या करुन आईने सूटकेसमध्ये भरला मृतदेह; कारण ऐकून कुटुंबिय हादरले
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2024 18:47 IST2024-08-27T18:39:55+5:302024-08-27T18:47:15+5:30
बिहारमध्ये प्रियकरासाठी एका महिलेने आपल्या पोटच्या मुलीची चाकूने गळा चिरुन हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

३ वर्षाच्या मुलीची हत्या करुन आईने सूटकेसमध्ये भरला मृतदेह; कारण ऐकून कुटुंबिय हादरले
Bihar Crime :बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये एका आईने प्रियकरासाठी आपल्या तीन वर्षांच्या मुलीची हत्या केली. मुलीचा मृतदेह सुटकेसमध्ये ठेवून घराच्या छतावरून फेकून दिला होता. पोलिसांनी आरोपी महिलेला अटक घरातून अटक केली आहे. हृदयाच्या तुकड्याला मारण्याइतकी कोणतीही आई क्रूर असू शकत नाही, पण हे सर्व घडले आहे आणि तेही दिवसाढवळ्या. प्रेमाच्या वेडात आई इतकी गुंग झाली की तिने चाकूने मुलीचा जीव घेतला. ज्या घरातून पोलिसांनी महिलेला अटक केली ते तिच्या प्रियकराचे आहे. मुलीचा खून केल्यानंतर ती महिला प्रियकराच्या पोहोचली होती. पण या खुनाची आपल्याला कल्पना नव्हती, असे प्रियकराने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी महिलेच्या प्रियकराचीही कसून चौकशी केली.
मुझफ्फरपूरच्या मिठानपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामबाग परिसरात ही धक्कादायक घटना उघडकीस आली. गेल्या आठवड्यात शनिवारी एका बंद सुटकेसमधून तीन वर्षांच्या मुलीचा मृतदेह सापडला होता. पोलिसांनी मृतदेह सापडल्यानंतर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवून दिला होता. पोलिसांनी तपास सुरू केला असता ही मनोज कुमार यांची तीन वर्षांची मुलगी मिस्टी असल्याचे समोर आलं. मात्र या घटनेनंतर मृत मुलीची आई घरातून बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिसांनी मृत मुलीची आई काजल हिचा कसून तपास सुरु केला होता. शेवटी काजल ही पोलिसांना प्रियकराच्या घरात सापडली.
आरोपी महिलेने पोलिसांना सांगितले की, "फेसबुकच्या माध्यमातून ती एका तरुणाच्या प्रेमात पडली होती. मात्र प्रियकर माझी मुलगी दत्तक घेण्यास तयार नव्हता. माझे माझ्या प्रियकरावर खूप प्रेम होते आणि मी त्याच्यासाठी कोणत्याही थराला जायला तयार होती. जेव्हा मला वाटलं की माझा प्रियकर माझ्यापासून दूर जात आहे, तेव्हा मी आपल्या मुलीला दूर करण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी नवरा दुकानात गेल्याने संधीचा फायदा घेत भाजी कापण्याच्या चाकूने मिस्टीचा गळा चिरून खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह घरात ठेवलेल्या सुटकेसमध्ये टाकून घराशेजारी फेकून दिला. त्यानंतर घरातून दागिने, पैसे आणि आधारकार्ड घेऊन मी प्रियकराकडे पळून गेली."
दरम्यान, मुलीच्या हत्येपासून तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यापर्यंत आणि घरातील रक्ताचे डाग साफ करण्यापर्यंतचे संपूर्ण काम महिलेने दोन तासांत एकटीने पूर्ण केले. ज्या वेळी मुलीची हत्या झाली तळमजल्यावर राहणारी वृद्ध महिला मुलाला पाहण्यासाठी रुग्णालयात गेली होती. तर काजलचा नवरा दुकानात गेला होता. त्यामुळे घरात काजल आणि तिच्या मुलीशिवाय कोणीच नव्हते. याचा फायदा घेत महिलेने दुपारी दीड ते साडेतीनच्या दरम्यान मुलीचा खून केला.