महाआघाडीचं ठरलं, बिहारमध्ये तेजस्वी यादव मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार, तर उपमुख्यमंत्रिपदासाठी 'या' नेत्याच्या नावाची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2025 13:31 IST2025-10-23T13:13:10+5:302025-10-23T13:31:20+5:30
Bihar Assembly Elelction 2025: आज महाआघाडीच्या नेत्यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेमधून तेजस्वी यादव यांची मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून, तर व्हीआयपी पक्षाच्या मुकेश सहानी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

महाआघाडीचं ठरलं, बिहारमध्ये तेजस्वी यादव मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार, तर उपमुख्यमंत्रिपदासाठी 'या' नेत्याच्या नावाची घोषणा
विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना बिहारमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल या महाआघाडीतील विरोधी पक्षांमध्ये मतभेद उफाळून आले होते. जागावाटपाचा तिढा न सुटल्याने काही ठिकाणी महाआघाडीतील मित्रपक्षांनी एकमेकांविरोधात उमेदवार दिल्याचे प्रकारही घडले. दरम्यान, आता काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे विश्वासू असलेले ज्येष्ठ नेते अशोक गहलोत यांच्या पुढाकाराने बिहारमधील महाआघाडीतील तिढा सुटला आहे. आज महाआघाडीच्या नेत्यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेमधून तेजस्वी यादव यांची मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून, तर व्हीआयपी पक्षाच्या मुकेश सहानी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
महाआघाडीतील मतभेद मिटवण्यासाठी पाटण्यामध्ये पोहोचलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गहलोत यांनी मुख्यमंत्रिपद आणि उपमुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यांची घोषणा केली. सर्वांची मतं विचारात घेतल्यानंतर या विधानसभा निवडणुकीसाठी तेजस्वी यादव हे महाआघाडीचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असतील. तर मुकेश सहानी हे उपमुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असतील, असे अशोक गहलोत यांनी सांगितले.
मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून नाव घोषित झाल्यानंतर तेजस्वी यादव म्हणाले की, मी सन्माननीय लालूप्रसाद यादव, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि महाआघाडीतील सर्व नेत्यांचे आभार मानतो. तुम्ही माझ्यावर जो विश्वास दर्शवलाय, तो मी सार्थ ठरवेन.
तत्पूर्वी महाआघाडीमध्ये मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावरून मतभेद असल्याचं वृत्त समोर आलं होतं. त्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गहलोत यांनी पाटणा येथे धाव घेत लालूप्रसाद यादव, तेजस्वी यादव यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर महाआघाडी एकजूट असून, निवडणुकीसाठी सज्ज असल्याचे सांगितले.