बिहार निवडणूक: तेजस्वी यादव काँग्रेससोबतच्या बैठकीतून निघून आले; राहुल गांधी, खर्गेंना न भेटताच बिहारला पोहोचले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 09:42 IST2025-10-14T09:42:04+5:302025-10-14T09:42:46+5:30
Bihar Assembly elections 2025: बिहार विधानसभा निवडणूक २०२५ पूर्वी महाआघाडीत जागावाटपावरून मोठा वाद. तेजस्वी यादव यांच्या RJD आणि काँग्रेसमधील वाटाघाटी फिसकटल्याने ऐक्य धोक्यात. वाचा सविस्तर.

बिहार निवडणूक: तेजस्वी यादव काँग्रेससोबतच्या बैठकीतून निघून आले; राहुल गांधी, खर्गेंना न भेटताच बिहारला पोहोचले...
पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीचा पहिला टप्पा जसजसा जवळ येत आहे, तसतसे राज्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. एकीकडे भाजपाने रालोआमधील नाराजी दूर करत जागावाटपाचा तिढा सोडविला असताना विरोधी पक्षांची महाआघाडी जागावाटपाच्या कठीण प्रक्रियेत अडकली आहे. राष्ट्रीय जनता दल (RJD) आणि काँग्रेस यांच्यात मतभेद निर्माण झाले आहेत. जागांच्या संख्येपेक्षा विशिष्ट मतदारसंघांवरून दोन्ही पक्षांमध्ये संघर्ष सुरू असल्याने महाआघाडीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील RJD ने काँग्रेसला ६१ जागा देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. मात्र, काँग्रेसने काही विशिष्ट जागांसाठी आग्रह धरला आहे, ज्या जागा सोडण्यास RJD तयार नाही. कहलगाव, नरपतगंज, वारिसलीगंज, चैनपूर आणि बछवारा यांसारख्या जागांवरून दोन्ही पक्षांमध्ये मोठा वाद सुरू आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बिहार काँग्रेसच्या नेत्यांना कोणत्याही परिस्थितीत महत्त्वाच्या जागा न सोडता कठोर वाटाघाटी करण्याचे निर्देश दिले आहेत.
या मतभेदांमुळे दोन्ही पक्षांतील तणाव वाढला आहे. सोमवारी झालेल्या काँग्रेस नेत्यांसोबतच्या दिल्लीतील बैठकीतून तेजस्वी यादव नाराज होऊन बाहेर पडले आहेत. दुसरीकडे, लालू प्रसाद यादव यांनी जागावाटपाचा अंतिम निर्णय होण्याआधीच पक्षाची चिन्हे वाटण्यास सुरुवात केल्यानेही गोंधळ निर्माण झाला आहे.
काँग्रेसनेही आपली भूमिका कठोर ठेवली असून, जर RJD कडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही, तर 'प्लॅन बी' तयार ठेवला आहे. या सर्व घडामोडींमुळे बिहारमधील महाआघाडीचे ऐक्य धोक्यात आले असून, जागावाटपाचा हा तिढा न सुटल्यास त्याचा थेट परिणाम निवडणुकीच्या निकालांवर होऊ शकतो. आता इंडिया आघाडीकडे केवळ आजचा दिवस असून या दिवसात तिढा सुटला नाही तर काँग्रेसला मोठा फटका बसणार आहे.