"माझी चूक काय? २० वर्ष मी पक्षासोबत एकनिष्ठ राहिली, तरीही..."; भाजपा महिला आमदाराला अश्रू अनावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 08:44 IST2025-10-16T08:44:00+5:302025-10-16T08:44:37+5:30
कुसुम देवी यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये संताप दिसून आला. आमदाराच्या घरी जमलेल्या कार्यकर्त्यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप जायस्वाल आणि नेते मिथिलेश तिवारी यांच्याविरोधात घोषणाबाजीही केली.

"माझी चूक काय? २० वर्ष मी पक्षासोबत एकनिष्ठ राहिली, तरीही..."; भाजपा महिला आमदाराला अश्रू अनावर
गोपालगंज - बिहार विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. त्यातच राजकीय पक्षांच्या उमेदवारी याद्या जाहीर होत आहेत. मात्र उमेदवारी तिकीट वाटपावरून प्रत्येक पक्षात नाराजीनाट्य पाहायला मिळत आहे. भाजपाने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली त्यात गोपालगंज सदरच्या आमदार कुसुम देवी यांचं तिकीट कापण्यात आलं. कुसुम देवी यांच्याऐवजी भाजपाने जिल्हा परिषद अध्यक्ष सुभाष सिंह यांना गोपालगंज सदर मतदारसंघातून उमेदवारी घोषित केली.
पक्षाने उमेदवारी यादी जाहीर केल्यानंतर गोपालगंजच्या विद्यमान आमदार कुसुम देवी यांना भावना अनावर झाल्या. त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची गर्दी झाली. यावेळी कुसुम देवी ढसाढसा रडल्या. आईचे अश्रू पाहून मुलगा अनिकेत सिंह यालाही स्वत:ला सावरता आले नाही, त्याचेही डोळे पाण्याने भरले. पक्षावर विश्वासघाताचा आरोप करत कुसुम देवी म्हणाल्या की, आम्ही मागील २० वर्षापासून भाजपात एकनिष्ठ राहिलो. पक्षाची सेवा केली, जेव्हा पक्षाला गरज होती, तेव्हाही जनतेत जाऊन काम केले. पक्षाने आम्हाला उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी करा असं सांगितले होते. परंतु माध्यमातून माझी उमेदवारी नाकारली हे कळले. एकीकडे महिला सशक्तीकरणावर बोलायचे आणि दुसरीकडे माझ्यासारख्या महिलेवर अन्याय करायचा असं त्यांनी म्हटलं.
तसेच माझी चूक काय होती हे पक्षाने सांगावे असा प्रश्न कुसुम देवी यांनी पक्षाला विचारला, तर आमदाराचा मुलगा अनिकेत सिंह यानेही उघडपणे पक्षाच्या वरिष्ठांवर नाराजी व्यक्त केली. पक्षाला आता कार्यकर्त्यांची गरज नाही. पैशाचे राजकारण सुरू आहे. प्रदेशाध्यक्ष आणि काही नेते तिकिटाचा व्यवसाय करतात. त्यामुळे जनताच आता भाजपाला धडा शिकवेल असा आरोप त्याने केला. कुसुम देवी यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये संताप दिसून आला. आमदाराच्या घरी जमलेल्या कार्यकर्त्यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप जायस्वाल आणि नेते मिथिलेश तिवारी यांच्याविरोधात घोषणाबाजीही केली.
दरम्यान, पक्षाने उमेदवारी नाकारल्याने कुसुम देवी भाजपात बंडखोरी करण्याची शक्यता वर्तवली जाते. समर्थकांकडून त्यांना अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आग्रह होत आहे. जर कुसुम देवी यांनी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला तर गोपालगंज आणि बैकुंठपूर या दोन्ही मतदारसंघातील गणित बदलू शकते. भाजपातील अंतर्गत नाराजी पाहता तिकीट वाटपावरून पक्षातच बंडखोरीने वरिष्ठांची डोकेदुखी वाढवली आहे.