’पुत्र मोहापायी लालू बनले धृतराष्ट्र’, बिहारमधील दारुण परभावानंतर ज्येष्ठ नेत्याने सुनावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 13:41 IST2025-11-17T13:39:04+5:302025-11-17T13:41:14+5:30
Bihar Assembly Election Result: राष्ट्रीय जनता दल पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि लालूप्रसाद यादव यांचे फार पूर्वीपासूनचे सहकारी शिवानंद तिवारी यांनी लालूप्रसाद यादव यांच्यावर बोचरी टीका केली आहे. पुत्रप्रेमाच्या मोहापायी लालूप्रसाद यादव हे धृतराष्ट्र बनले असल्याची टीका शिवानंद तिवारी यांनी केली आहे.

’पुत्र मोहापायी लालू बनले धृतराष्ट्र’, बिहारमधील दारुण परभावानंतर ज्येष्ठ नेत्याने सुनावले
नुकत्याच लागलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल पक्षाचा दारुण पराभव झाला. या पराभवानंतर लालूंच्या कुटुंबात मतभेद उफाळून आले असून, लालूंच्या कन्या रोहिणी आचार्य यांनी कुटुंबाशी असलेले नातेसंबंध तोडण्याची घोषणा केली. एवढंच नाही तर तेजस्वी यादव यांनी बहीण रोहिणी आचार्य यांना अपमानित केल्याचाही दावा केला जात आहे. यादरम्यान, आता राष्ट्रीय जनता दल पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि लालूप्रसाद यादव यांचे फार पूर्वीपासूनचे सहकारी शिवानंद तिवारी यांनी लालूप्रसाद यादव यांच्यावर बोचरी टीका केली आहे. पुत्रप्रेमाच्या मोहापायी लालूप्रसाद यादव हे धृतराष्ट्र बनले असल्याची टीका शिवानंद तिवारी यांनी केली आहे.
शिवानंद तिवारी यांनी सोशल मीडियावरील एका पोस्टमधून लालूप्रसाद यादव यांच्यावर ही टीका केली आहे. यावेळी लालूप्रसाद यादव यांच्यासोबत आणीबाणीवेळी भोगलेल्या तुरुंगावासाच्या आठवणींना उजाळा देतानाच लालूंच्या राजकारणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. तिवारी म्हणाले की, लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबीयांनी खूप जोर लावला, मात्र त्यांच्या पक्षाचे केवळ २५ आमदारच निवडून आले. मी स्वत: पक्षाचा राष्ट्रीय उपाध्यक्ष होतो, असं असताना असं का बोलत हे, असं कुणालाही वाटेल, मात्र तो आता भुतकाळ झालाय. तेजस्वी यादव यांनी मला उपाध्यक्षपदावरून हटवलं, एवढंच नाही तर कार्यकारिणीमध्येही स्थान दिलं नाही. कारण मी मतदार याद्यांच्या पुनरीक्षणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत हा लोकशाहीविरुद्धचा कट असल्याचं म्हटलं होतं.
मतदार याद्यांच्या पुनरीक्षणाविरोधात राहुल गांधींसोबत रस्त्यावर उतरा, संघर्ष करा, पोलिसांच्या लाठ्याकाठ्या खा, तुरुंगात जा, असा सल्ला मी तेजस्वी यादव यांना दिला होता. मात्र तेजस्वी यादव हे आपल्या स्वप्नांच्या दुनियेत मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत होते. त्यांना वास्तवाची जाणीव करून देत मी त्यांचा स्वप्न भंग करत होतो. तर लालू यादव धृतराष्ट्राप्रमाणे मुलासाठी राजसिंहासन गरम करत होते. मात्र आता मी मुक्त झालो आहे, आता मी असा कहाण्या ऐकवत राहीन, असे संकेतही शिवानंद तिवारी यांनी दिले.