बिहारमध्ये NDA ला आघाडी, भाजप-जेडीयूच्या जागा वाढल्या; तेजस्वी यादवांना 'या' ५ चुका पडल्या महागात!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 13:02 IST2025-11-14T13:01:01+5:302025-11-14T13:02:31+5:30
Bihar Assembly Election 2025: बिहार विधानसभा निवडणूक २०२५ चा निकाल राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

बिहारमध्ये NDA ला आघाडी, भाजप-जेडीयूच्या जागा वाढल्या; तेजस्वी यादवांना 'या' ५ चुका पडल्या महागात!
बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या कलांमध्ये राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्या पुनरागमनाच्या आशेला मोठा धक्का बसल्याचे दिसत आहे. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार, एनडीए स्पष्ट बहुमताकडे वाटचाल करत असून, महाआघाडी ५० पेक्षा कमी जागेवर आघाडीवर आहे. दरम्यान, तेजस्वी यादव यांच्या प्रचारात मोठी गर्दी दिसूनही निकालांमध्ये आघाडी मिळवता आली नाही. त्यांच्या रणनीतीत नेमक्या कोणत्या त्रुटी राहिल्या, याची चर्चा सुरू झाली आहे.
२०२० मध्ये ७८ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष बनलेल्या आरजेडीला यावेळी फक्त ३३ जागांवर आघाडी मिळाल्याचे दिसत आहे, जे गेल्या वेळेच्या तुलनेत निम्म्यापेक्षा कमी आहे. एनडीए २०० जागांचा आकडा ओलांडण्याच्या दिशेने वाटचाल करत असून, जर हे कल निकालात रूपांतरित झाले, तर हा पराभव २०१० च्या निवडणुकीसारखा असेल, जेव्हा आरजेडीला केवळ २२ जागांवर समाधान मानावे लागले होते.
तेजस्वी यादवांना 'या' ५ चुका पडल्या महागात
१) लालू यादव यांची प्रचारात अनुपस्थिती
बिहारच्या राजकारणाचे केंद्रबिंदू असलेले लालू प्रसाद यादव यांची निवडणुकीच्या प्रचारात असलेली अनुपस्थिती आरजेडीला महागात पडली. लालूंच्या अनुपस्थितीमुळे अनेक समर्थक निराश झाले. दुसरीकडे, विरोधकांनी प्रचारात 'जंगल राज'चा सातत्याने उल्लेख केला. ज्यामुळे आरजेडीच्या नुकसान झाले.
२) कौटुंबिक कलह
तेजप्रताप यादव यांनी या निवडणुकीत वेगळ्या पक्षातून निवडणूक लढवली. त्यांनी केवळ स्वतःचा पराभव करून घेतला नाही, तर अनेक ठिकाणी आरजेडीच्या उमेदवारांना नुकसान पोहोचवले. तेज प्रताप यांच्या या भूमिकेमुळे आरजेडीला मोठा फटका बसला. कौटुंबिक कलहामुळे २०१७ मध्ये उत्तर प्रदेशात सपाला जसा फटका बसला, तसाच फटका आरजेडीला बसल्याचे दिसून येते.
३) नितीश कुमार आणि नरेंद्र मोदी यांची एकजूट
एनडीएने सुरुवातीपासूनच उत्कृष्ट समन्वय राखला. जागावाटप स्पष्ट झाले आणि वेळेत प्रचार सुरू झाला. विशेष म्हणजे, नितीश कुमार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेकदा एकत्र मंचावर येऊन प्रचार केला, ज्यामुळे मतदारांमध्ये विश्वास निर्माण झाला. याउलट, महाआघाडी कमकुवत दिसली.
४) आश्वासनांऐवजी कामगिरीवर विश्वास
तेजस्वी यादव यांनी प्रत्येक कुटुंबाला सरकारी नोकरी देण्यासह अनेक मोठी आश्वासने दिली. मात्र, नितीश कुमार यांची महिलांना १०,००० रुपये देण्याची योजना तेजस्वी यादव यांच्यावर भारी पडली. मतदारांनी आश्वासनांऐवजी जुन्या कामगिरीवर अधिक विश्वास ठेवल्याचे दिसून येते.
५) जागा वाटपाचा वाद आणि काँग्रेसचा कमकुवत प्रचार
महाआघाडीतील घटक पक्षांमध्ये जागा वाटपाचा वाद पूर्णपणे सुटला नाही. सुमारे एक डझन जागांवर मैत्रीपूर्ण लढती झाल्याची चर्चा आहे. शिवाय, प्रचाराचे नेतृत्व करणारे राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली. काँग्रेसने ६२ जागा लढवूनही फक्त ५ जागांवर आघाडी मिळवली आहे, ज्यामुळे महाआघाडीच्या एकूण कामगिरीवर नकारात्मक परिणाम झाला.