सरकारवरच्या विश्वासामुळे महिलांकडून भरभरून मते, महिला मतदानाची टक्केवारी ठरली निर्णायक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 08:55 IST2025-11-15T08:55:26+5:302025-11-15T08:55:48+5:30
Bihar Assembly Election 2025: बिहारमध्ये विधानसभा निवडणुकांत एकूण ६७.१३ टक्के मतदान झाले. राज्यातील एकूण महिला मतदारांची मतदानाची टक्केवारी होती ७१.७८, तर पुरुषांच्या मतदानाचे प्रमाण ६२.९८ टक्के होती.

सरकारवरच्या विश्वासामुळे महिलांकडून भरभरून मते, महिला मतदानाची टक्केवारी ठरली निर्णायक
बिहारमध्ये विधानसभा निवडणुकांत एकूण ६७.१३ टक्के मतदान झाले. राज्यातील एकूण महिला मतदारांची मतदानाची टक्केवारी होती ७१.७८, तर पुरुषांच्या मतदानाचे प्रमाण ६२.९८ टक्के होती. राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये महिलांनी पुरुषांपेक्षा १० ते २० टक्के अधिक मतदान केले. सुपौलमध्ये महिलांनी पुरुषांपेक्षा २०.७१ टक्के अधिक मतदान केले. असे चित्र किशनगंज, मधुबनी, गोपालगंज, अररिया, दरभंगा आणि मधेपुरा येथे दिसले. बिहारमध्ये गेल्या १५ वर्षांत महिला आपणहून मतदान करण्यासाठी बाहेर पडत आहेत या विधानसभा निवडणुकांत त्यांनी विक्रमच केला.
दारूबंदीचेही एनडीएला मिळाले राजकीय फायदे
बिहारमधील दारूबंदी आजही मतदारांना, विशेषतः महिलांना दिलासा देते. दारूबंदीमुळे घरगुती हिंसेचे प्रमाण कमी झाले. बचत वाढली. कुटुंबांचे जीवनमान सुधारले. अशा दारूबंदीच्या योजनेमुळे आपल्याला फायदा झाल्याचे सर्वसामान्य महिलांचे मत आहे. त्याचा राजकीय लाभ एनडीएला मिळाला.
१.८० लाख जीविकादीदींनी मतदारांना सक्रिय केले
निवडणूक आयोगाने जीविकादीदींचे नेटवर्क कार्यरत केले. यांची संख्या जवळपास १.८० लाख होती. त्यांनी विशेष करून महिला व तरुण मतदारांमध्ये नोंदणीविषयी जनजागृती केली. मतदारांना कागदपत्रांसंबंधी मदत केली. मतदान बूथसंबंधी मार्गदर्शन केले. त्यांचा प्रभाव मतदारांवर दिसला.
महिलांसाठीची १०,००० रुपयांच्या मदतीची घोषणा ठरली मोठे आकर्षण
पात्र महिलांना १० हजार रुपयांची मदत देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेद्वारे बिहारमधील एनडीए सरकारने दिले होते. त्याचा मोठा प्रभाव महिला मतदारांवर पडला. बिहारमध्ये ३४ टक्क्यांपेक्षा जास्त कुटुंबांचे मासिक उत्पन्न ६ हजार रुपये किंवा त्यापेक्षा कमी आहे. गरीब, अनुसूचित जाती व ईबीसी कुटुंबांमध्ये १० हजार रुपये म्हणजे मासिक उत्पन्नाहून अधिक रकमेचा आधार मिळणार होता. यामुळे ही योजना निव्वळ निवडणूक घोषणा ठरली नाही. अनेक महिलांना ती स्वावलंबी बनवणारी योजना वाटली.