बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 20:36 IST2025-11-13T20:33:35+5:302025-11-13T20:36:24+5:30
...तत्पूर्वी, राजद नेते तेजस्वी यादव यांनी “१८ नोव्हेंबरला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेईन”, असे विधान केले होते.

बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांपूर्वीच मुख्यमंत्रीपदाची चर्चा रुंगू लागली आहे. दरम्यान लोजपा (रामविलास) ने मोठा दावा केला आहे. पक्षाच्या खासदार शांभवी चौधरी यांनी पाटण्यात पत्रकारांशी बोलताना, “बिहारमध्ये पुन्हा एकदा एनडीए सरकार स्थापन होईल आणि नीतीश कुमार मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील,” असे म्हटले आहे.
तत्पूर्वी, राजद नेते तेजस्वी यादव यांनी “१८ नोव्हेंबरला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेईन”, असे विधान केले होते. याला प्रत्युत्तर देताना शांभवी म्हणाल्या, “स्वप्न पाहणे चांगले असते, पण मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहू नये. बिहारच्या जनतेने पुढील पाच वर्षांसाठी नीतीश कुमार यांनाच पुन्हा मुख्यमंत्री बनवण्याचा संकल्प केला आहे आणि मतदानातून तो पूर्णही केला आहे.”
शांभवी चौधरी पुढे म्हणाल्या, “निवडणूक निकालाला आता फारसा वेळ उरलेला नाही. १४ नोव्हेंबरला कोण सरकार बनवते, हे संपूर्ण देश बघेल.” त्यांनी जेडीयू कार्यकर्त्यांनी लावलेल्या “टायगर जिंदा है” पोस्टरसंदर्भातही प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, “ही कार्यकर्त्यांची भावना व्यक्त करण्याची पद्धत आहे. पण हे निश्चित की, नीतीश कुमार आजही बिहारच्या जनतेच्या मनात जिवंत आहेत.”
“नीतीश कुमार २००५ मध्ये जेवढे सक्षम आणि जनतेशी जोडलेले होते, तेवढेच आजही आहेत. महिलांना दिलेले प्रतिनिधित्व हे बदलत्या बिहारचे चित्र स्पष्ट करते. आज महिला सुरक्षित आहेत, आत्मविश्वासाने उभ्या आहेत. आता बिहारमध्ये बूथ लुटले जात नाहीत, मतदानाद्वारेच निवडणुका जिंकल्या जातात. तेजस्वी यादव केवळ निवडणुकीच्या काळात दिसतात, पण एनडीएचे नेते, नरेंद्र मोदी, नीतीश कुमार आणि चिराग पासवान वर्षभर लोकांसाठी कार्यरत असतात. आता केवळ २४ तास शिल्लक आहेत, बघूया कोण मुख्यमंत्रीपदाची शपथ घेते,” असेही शांभवी चौधरी म्हणाल्या.