विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 06:05 IST2025-11-12T06:05:06+5:302025-11-12T06:05:23+5:30
Bihar Assembly Election 2025: बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या व अंतिम टप्प्यात १२२ विधानसभा जागांसाठी मंगळवारी आजवरचे सर्वाधिक म्हणजे विक्रमी ६८.७९% मतदान झाले. बिहारमध्ये एकूण मतदान ६६.९०% झाले. हे मतदान गेल्या निवडणुकीच्या तुलनेत ९.६% अधिक आहे.

विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
पाटणा - बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या व अंतिम टप्प्यात १२२ विधानसभा जागांसाठी मंगळवारी आजवरचे सर्वाधिक म्हणजे विक्रमी ६८.७९% मतदान झाले. बिहारमध्ये एकूण मतदान ६६.९०% झाले. हे मतदान गेल्या निवडणुकीच्या तुलनेत ९.६% अधिक आहे. १४ नोव्हेंबरला मतमोजणी होत आहे. ६ नोव्हेंबरला पहिल्या टप्प्यात ६५.०९ टक्के मतदान झाले होते. तो विक्रम पाच दिवसांतच मोडला. मतदानाची वेळ संपली तरी सायंकाळी पाचनंतर मतदान केंद्रांवर लांब रांगा होत्या. त्यामुळे मतदानाची टक्केवारी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
असे पक्ष, अशी आशा : २०२० मध्ये काँग्रेसने १९ जागा जिंकल्या होत्या. त्यातील १२ जागा या टप्प्यात आहेत. जनसुराजचे प्रशांत किशोर म्हणतात, ‘बिहारी जनतेने पर्याय निवडला असल्याचे हे संकेत आहेत.’ उपमुख्यमंत्री विजयकुमार सिन्हा म्हणाले, ‘जनता सबका साथ-सबका विकास मंत्रावर चालत आहे. हे विक्रमी मतदान आपल्याच बाजूने असल्याचा दोन्ही आघाडीच्या नेत्यांचा दावा आहे.
आठ मंत्री मैदानात
मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या मंत्रिमंडळातील आठ मंत्री या टप्प्यात निवडणूक मैदानात आहेत. विशेष म्हणजे, अल्पसंख्याक बहुल भाग असल्याने सत्ताधारी ‘एनडीए’ला शह देण्यासाठी महाआघाडीला या भागातून खूप आशा आहेत.
अल्पसंख्याकांची मोठी संख्या : या टप्प्यात ७० टक्क्यांहून अधिक मतदान झालेल्या मतदारसंघांतील बहुतांश जिल्हे नेपाळ सीमेनजीक कोसी-सीमांचल भागात आहेत. अल्पसंख्याक बहुल हा भाग आहे.