EVM मध्ये ३६ मतांची आघाडी, पण ३६० पोस्टल मते बाद झाली आणि पारडे फिरले, बिहारमधील अजब निकाल चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 16:25 IST2025-11-20T16:22:37+5:302025-11-20T16:25:02+5:30
Bihar Assembly Election 2025 Result: बिहारमधील काही विधानसभा मतदारसंघांमध्ये अगदी मोजक्या मतांच्या फरकाने जय-पराजयाचा निर्णय झाला. त्यापैकी काही ठिकाणी जय-पराजयातील अंतरापेक्षा बाद झालेल्या पोस्टल मतांची संख्या अधिक असल्याचे समोर आले आहे.

EVM मध्ये ३६ मतांची आघाडी, पण ३६० पोस्टल मते बाद झाली आणि पारडे फिरले, बिहारमधील अजब निकाल चर्चेत
नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएने दणदणीत विजय मिळवला होता. त्यानंतर आज नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधीही पार पडला आहे. दरम्यान, बिहारमधील विधानसभा निवडणुकीतील निकालाची सविस्तर आकडेवारी समोर आली असून, त्यामधून काही धक्कादायक माहिती समोर आली आहे. बिहारमधील काही विधानसभा मतदारसंघांमध्ये अगदी मोजक्या मतांच्या फरकाने जय-पराजयाचा निर्णय झाला. त्यापैकी काही ठिकाणी जय-पराजयातील अंतरापेक्षा बाद झालेल्या पोस्टल मतांची संख्या अधिक असल्याचे समोर आले आहे.
बिहारमधील संदेश, अगिआंव, नबीनगर आणि रामगड विधानसभा मतदारसंघांमध्ये अगदी थोड्या फरकाने निकाल लागला. त्यात संदेश विधानसभा मतदारसंघामध्ये जेडीयूचे उमेदवार अवघ्या २७ मतांनी विजयी झाले. येथील जय पराजयाचा फैसला हा पोस्टल मतांमधील अंतरावरून झाला. संदेश मतदारसंघातील ईव्हीएम मतांच्या मतमोजणीत आरजेडीचे उमेदवार दिपू सिंह यांना ३६ मतांची आघाडी होती. मात्र बॅलेट पेपरवरली मतमोजणीत जेडीयूच्या उमेदवाराला ६३ मतांची आघाडी मिळाली आणि त्या आघाडीच्या जोरावर जेडीयूच्या राधाचंदन साह यांनी अवघ्या २७ मतांनी बाजी मारली. धक्कादायक बाब म्हणजे येथे तब्बल ३६० पोस्टल मते बाद ठरवण्यात आली होती. यापैकी काही पोस्टल मते जरी वैध ठरली असती तरी निकालावर परिणाम होऊ शकला असता.
बिहारमधील नबीनगर विधानसभा मतदारसंघातही अशीच अटीतटीची लढत झाली. येथे जेडीयूच्या चेतन आनंद यांनी ११२ मतांनी विजय मिळवला. त्यांनी आरजेडीच्या आमोद कुमार सिंह यांना पराभूत केले. येथे झालेल्या पोस्टल मतदानापैकी १३२ मते बाद झाली. जर ही मते बाद झाली नसती तर वेगळा निकाल लागला असता, असे आता बोलले जात आहे.