झामुमोने दिला ‘एकला चलो’चा नारा; महाआघाडी आता फुटीच्या उंबरठ्यावर, जागावाटपावरून मतभेद
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 05:50 IST2025-10-20T05:49:26+5:302025-10-20T05:50:38+5:30
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत तोंडावर, तरीही जागावाटपाबाबत तोडगा नाहीच

झामुमोने दिला ‘एकला चलो’चा नारा; महाआघाडी आता फुटीच्या उंबरठ्यावर, जागावाटपावरून मतभेद
एस. पी. सिन्हा, लोकमत न्यूज नेटवर्क, पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत महाआघाडी फुटीच्या उंबरठ्यावर असून, एकिकडे जागावाटपावरून मतभेद असताना आता झारखंड मुक्ती मोर्चाने (झामुमो) स्वतंत्रपणे लढण्याची घोषणा केली आहे. या शेजारी राज्यातील निवडणुकीनंतर झारखंडमध्ये काँग्रेस आणि राजदसोबत असलेल्या आघाडीचाही झामुमो फेरविचार करेल.
जागावाटपावरून महाआघाडीत उघड मतभेद दिसत आहेत. अनेक मतदारसंघांत ‘मैत्रीपूर्ण लढती’ दिसत आहेत. दरम्यान, राजद आणि काँग्रेसमधील वाटाघाटी थांबल्या असल्याचे वृत्त आहे. मतदार हक्क यात्रेदरम्यान तेजस्वी यादव आणि राहुल गांधी एकाच व्यासपीठावर एकत्र आले होते. तथापि, आता परिस्थिती बदलली आहे. भाकप, माकपसारख्या मित्रपक्षांनीही अनेक जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत.
नेतृत्वाचीही स्पर्धा
काँग्रेस व राजद यांच्यातील मतभेद हे केवळ जागा वाटपापुरते नाहीत, तर नेतृत्व व परस्पर विश्वासाचाही मुद्दा यात आहे. या पक्षांनी अनेक ठिकाणी वेगवेगळे उमेदवारी अर्ज दाखल केल्याने कार्यकर्त्यांतही संभ्रमाची स्थिती आहे. जागावाटपात झालेल्या विलंबामुळे लालूप्रसाद यादव यांनी महाआघाडीची वाट न पाहता आपल्या उमेदवारांना चिन्हांचे वाटप सुरू केले होते. यामुळे पेच अधिक वाढला आहे. पहिल्या टप्प्यात उमेदवार अर्ज मागे घेण्याची सोमवार ही मुदत आहे. एकच दिवस शिल्लक असताना जागावाटपावरून काँग्रेस-राजद वाद चव्हाट्यावर आला आहे. राजद व डाव्या पक्षांनी काँग्रेसला दिलेल्या १० जागांवर उमेदवार उभे केले आहेत.
५२ उमेदवारांची राजदची पहिली यादी
बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपताच राष्ट्रीय जनता दलाने (राजद) रविारी पहिली अधिकृत यादी जाहीर केली. यात पूर्वीच अर्ज दाखल केलेल्या ५२ उमेदवारांची नावे आहेत.
राजदने आधीच १०० उमेदवारांना चिन्हांचे वाटप केले आहे. उर्वरित जागांसाठी उमेदवारांची नावे लवकरच जाहीर केली जातील. पहिल्या यादीत ५२ नावांमध्ये २२ यादव व ३ मुस्लीम, तर भूमिहार आणि ब्राह्मण समुदायातील ३ उमेदवारांचा समावेश आहे.तेजस्वी यादव राघोपूर येथून निवडणूक लढवत आहेत. त्यांची लढत भाजपच्या सतीश यादव यांच्याशी होणार आहे.
असदुद्दीन ओवैसींच्या एमआयएमची २५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएमने बिहार विधानसभा निवडणुकीसाठी २५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. सीमांचल या त्यांच्या पारंपरिक बालेकिल्ल्याच्या आणि उत्तर आणि दक्षिण बिहारमधील भागातून त्यांनी ही उमेदवारी दिली आहे. यावेळी मोजक्या जागा नव्हे, तर संपूर्ण बिहारवर लक्ष केंद्रित केल्याचे हे संकेत आहेत.
दोन हिंदू उमेदवार : पक्षाने मुस्लीमबहुल भागातून उभ्या केलेल्या दोन हिंदू उमेदवारांची सध्या प्रचंड चर्चा आहे. ढाका येथून राणा रणजितसिंह आणि सिकंदरा येथून मनोज कुमार दास यांना उमेदवारी दिली आहे. राणा रणजितसिंह हे माजी खासदार सीतारामसिंह यांचे पुत्र व भाजपचे माजी मंत्री रणधीर सिंह यांचे भाऊ आहेत.
महाआघाडीमधील नेते म्हणतात...
महाआघाडी एकसंध आहे. कुठेही संघर्ष नाही. एनडीए अफवा पसरवत आहे. निकालानंतर वास्तव स्थिती कळेलच. भाजपने नितीशकुमार यांना मुख्यमंत्रिपद दिले नसल्याचे सर्वांना कळेल, असे राजदचे प्रवक्ते मृत्युंजय तिवारी यांनी म्हटले आहे.
आम्ही काही जागांवर चर्चा करीत आहोत, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष राजेश राम यांनी म्हटले आहे. महाआघाडीत एकजूट कायम असल्याचा दावाही त्यांनी केला.
व्हीआयपी प्रमुख मुकेश साहनी म्हणतात, ‘आम्ही मोठ्या ताकदीने मैदानात उतरत आहोत. निकाल येऊ द्या, महाआघाडीचे सरकार स्थापन झालेले दिसेल. मी उपमुख्यमंत्री होईन.’
तिकीट न मिळाल्याने नाराज नेत्यांचा लालूंच्या निवासस्थानी गोंधळ
महाआघाडीतील घटक पक्षांत जागावाटपावरून एकमत होऊ शकले नसल्याने आघाडीतील अंतर्गत मतभेद समोर आले आहेत. दरम्यान, रविवारी राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्या पाटणा येथील निवासस्थानाबाहेर नाराज झालेल्या इच्छुकांनी प्रचंड गोंधळ घातला. या नाट्यमय घडामोडींत काहींनी अंगावरील कपडे फाडले, काही मोठमोठ्याने रडू लागले तर काही रस्त्यावर झोपले.
मधुबनमधून इच्छुक मदन शाह यांनी लालूंच्या निवासस्थानी अंगातील कुर्ता फाडला आणि रडत रस्त्यावर झोपले. पक्षाने त्यांचे तिकीट कापून डॉ. संतोष कुशवाह यांना दिले आहे. आपण वर्षानुवर्षे पक्षाचे काम करीत असल्याचे सांगून पैशाचा निकष लावून तिकिटे वाटली गेल्याचा आरोप त्यांनी केला. आपल्याला तिकिटासाठी २.७० कोटी रुपये मागितल्याचा आरोप शाह यांनी केला. रात्री उशिरा १ वाजेपर्यंत ते निवासस्थानाबाहेर उभे होते. पहाटे ३ वाजता त्यांना घरी जाण्यास सांगण्यात आले.
उषादेवींनाही डावलले : बाराचट्टी विधानसभा मतदारसंघातून इच्छुक आरजेडी नेत्या उषा देवी रविवारी पाटणा येथील राबडी देवी यांच्या निवासस्थानी पोहोचल्या. माध्यमांशी बोलताना भावुक झाल्या.