२३ कोटींच्या दारूसह ६४ कोटींच्या वस्तू जप्त; प्रलोभन दाखविणाऱ्या प्रयत्नांविरोधात कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2025 07:22 IST2025-10-21T07:21:45+5:302025-10-21T07:22:27+5:30
बिहारमध्ये आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुमारे एकूण ६४.१३ कोटी रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आल्याची निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली.

२३ कोटींच्या दारूसह ६४ कोटींच्या वस्तू जप्त; प्रलोभन दाखविणाऱ्या प्रयत्नांविरोधात कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क, पाटणा: बिहारमध्ये आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ६ ऑक्टोबरपासून आतापर्यंत राज्यभरात रोख रक्कम, अमलीपदार्थ आणि मोफत वाटपासाठीच्या वस्तू असा सुमारे एकूण ६४.१३ कोटी रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आल्याची निवडणूक अधिकाऱ्यांनी सोमवारी (दि. २०) दिली.
या गुन्ह्यांमध्ये पोलिस आणि अन्य संबंधित तपास यंत्रणांनी ६ ऑक्टोबरपासून आतापर्यंत ७५३ जणांना अटक केली असून, १३,५८७ अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आली आहेत, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. बिहारमध्ये दारूबंदी असून, तरीही तिथे २३.४१ कोटी रुपये किमतीची दारू जप्त करण्यात आली ही माहिती बिहारच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयाने दिली.
निवडणुकीत पैशाच्या गैरवापराला आळा घालण्यासाठी विविध अंमलबजावणी यंत्रणांनी सतर्क राहावे, असे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.
कारवाईच्या सूचना
बिहारमधील पोलिस, उत्पादन शुल्क विभाग, आयकर विभाग, सीमाशुल्क, महसूल गुप्तचर आणि अंमलबजावणी संचालनालय (ईडी) या यंत्रणांना कारवाईच्या सूचना सरकारने दिल्या आहेत. पहिल्या टप्प्यातील घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाने १२१ सामान्य निरीक्षक, १८ पोलिस निरीक्षक तर दुसऱ्या टप्प्यासाठी १२२ सामान्य निरीक्षक, २० पोलिस निरीक्षक नेमले आहेत.
४ कोटींची रोकड सापडली
दारू २३.४१ कोटी रुपये
वाटपासाठीच्या वस्तू १४ कोटी रुपये
अमलीपदार्थ १६.८८ कोटी रुपये
रोख रक्कम ४.१९ कोटी रुपये