बिहारच्या राजकारणात Gen Z उमेदवारांची चर्चा; मैथिली ठाकूरसह कोण-कोण मैदानात? पाहा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 12:44 IST2025-10-30T12:43:55+5:302025-10-30T12:44:49+5:30
बिहारमध्ये यंदा अनेक तरुण आपल्या राजकारणाची सुरुवात करताना दिसत आहेत.

बिहारच्या राजकारणात Gen Z उमेदवारांची चर्चा; मैथिली ठाकूरसह कोण-कोण मैदानात? पाहा...
Bihar Assembly Election 2025 : राजकारणात अनुभवाला नेहमीच मोठे महत्त्व दिले जाते, मात्र आजकाल तरुणांनाही संधी मिळू लागली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत याचा प्रत्यय आला आहे. एकीकडे बिहारमधील ज्येष्ठ नेते आपली शेवटची राजकीय इनिंग जिंकण्याच्या प्रयत्नात आहेत, तर नव्या पिढीतील युवा आपले राजकीय करिअर सुरू करण्यासाठी उत्सुक आहेत. नेपाळमधील आंदोलनानंतर Gen Z शब्द खूप चर्चेत आला. आता बिहारच्या राजकीय रणांगणात हेच Gen Z चर्चेत आले आहेत.
कोण आहेत हे ‘Gen Z’?
बिहारमध्ये यंदा अनेक तरुण आपल्या राजकारणाची सुरुवात करताना दिसत आहेत. Gen Z म्हणजे 1997 ते 2012 दरम्यान जन्मलेली पिढी, जी इंटरनेट आणि स्मार्टफोनसह वाढलेली पहिली पिढी आहे. त्यांना डिजिटल नेटिव्ह्स म्हटले जाते. देशात निवडणूक लढवण्याची किमान वयोमर्यादा 25 वर्षे आहे. त्यामुळे बिहारच्या निवडणुकीत या वयोगटातील काही चेहरे चर्चेत आले आहेत.
गायिका मैथिली ठाकुर
25 वर्षीय मैथिली ठाकुर ही या निवडणुकीतील सर्वात तरुण आणि चर्चित उमेदवार ठरली आहे. ती लोकप्रिय गायिका असून, तिचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर तिने राजकारणात प्रवेश केला आणि भाजपने तिला दरभंगा जिल्ह्याच्या अलीनगर मतदारसंघातून उमेदवारी दिली. या जागेवर आरजेडीचे बिनोद मिश्रा आणि जनसुराजचे विप्लव चौधरी यांच्याशी तिची थेट लढत आहे. स्थानिक पातळीवर काही भाजप नेत्यांनी तिच्या उमेदवारीचा विरोध केला असला तरी मैथिली जोमाने प्रचारात गुंतली आहे.
रवीना कुशवाहा
समस्तीपूर जिल्ह्यातील विभूतिनगरमधून 27 वर्षीय रवीना कुशवाहा जनतादल (युनायटेड) च्या तिकिटावर लढत आहे. तिचे पती राम बालक कुशवाहा हे माजी आमदार असून, कायदेशीर अडचणींमुळे त्यांनी निवडणूक न लढवता पत्नीला संधी दिली आहे. विशेष म्हणजे, रवीना आणि राम बालक यांच्यात तब्बल 26 वर्षांचे वयाचे अंतर आहे.
शिवानी शुक्ला
28 वर्षीय शिवानी शुक्ला ही बाहुबली मुन्ना शुक्ला यांची कन्या आहे. आरजेडीने तिला वैशाली जिल्ह्यातील लालगंज सीटवरून उमेदवारी दिली आहे. लंडन विद्यापीठातून तिने कायद्याची पदवी घेतली असून, ती पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहे. तिचा सामना भाजप आमदार संजय कुमार सिंह यांच्याशी आहे.
दीपू सिंह
भोजपूर जिल्ह्यातील संदेश विधानसभा जागेवर 28 वर्षीय दीपू सिंह आरजेडीच्या तिकिटावर लढत आहे. तिचे वडील अरुण यादव आणि आई किरण देवी दोघेही या भागातून आमदार राहिले आहेत. त्यामुळे या घराण्याचा प्रभाव या मतदारसंघात स्पष्ट दिसतो.
इतर तरुण उमेदवार...
29 वर्षीय रविरंजन (आरजेडी, अस्थावां), धनंजय कुमार (CPI-ML, भोरे) आणि रुपा कुमारी (LJP-रामविलास, फतुहा) हे देखील युवा पिढीचे प्रतिनिधी आहेत. तर 30 वर्षांचे आदित्य कुमार, कोमल कुशवाहा आणि राकेश रंजन हे देखील विविध पक्षांकडून लढत आहेत.