एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 06:54 IST2025-11-12T06:53:39+5:302025-11-12T06:54:17+5:30
Bihar Assembly Election 2025: देशाच्या राजकारणाला अभूतपूर्व वळण लावणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकांच्या एक्झिट पोलमध्ये भाजप-जनता दल युनायटेड-लोक जनशक्ती पार्टी यांच्या एनडीए आघाडीला स्पष्ट बहुमत मिळालेले दिसत असून राष्ट्रीय जनता दल-काँग्रेस यांची महाआघाडी व प्रशांत किशोर यांच्या जनसुराज्य पक्षाला अनपेक्षित असा मोठ्या पराभवाचा फटका बसल्याचे चित्र आहे.

एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
नवी दिल्ली - देशाच्या राजकारणाला अभूतपूर्व वळण लावणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकांच्या एक्झिट पोलमध्ये भाजप-जनता दल युनायटेड-लोक जनशक्ती पार्टी यांच्या एनडीए आघाडीला स्पष्ट बहुमत मिळालेले दिसत असून राष्ट्रीय जनता दल-काँग्रेस यांची महाआघाडी व प्रशांत किशोर यांच्या जनसुराज्य पक्षाला अनपेक्षित असा मोठ्या पराभवाचा फटका बसल्याचे चित्र आहे.
एक्झिट पोलसारखे प्रत्यक्ष निकाल लागल्यास बिहारची जनता नितीश कुमार यांच्या आजही पाठीशी असल्याचे दिसून येईल.
दुसऱ्या टप्प्यातही विक्रमी ६८.७९ टक्के मतदान
मंगळवारी दुसऱ्या टप्प्यात १२२ जागांसाठी विक्रमी ६८.७९% इतके मतदान झाले. ही आकडेवारी वाढण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यातही ६५.०९% विक्रमी मतदान झाले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्या टप्प्यातही मतदारांनी भरभरून मतदान करावे असे आवाहन केले होते. १४ नोव्हेंबरला निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत.
प्रशांत किशोर यांच्या जनसुराज्यला ३ ते ५ जागा
गेल्या निवडणुकीत एनडीएला १२५, महाआघाडीला ११० आणि इतरांना ८ जागा मिळाल्या होत्या. याचा अर्थ असा की, यावेळी एनडीएला अंदाजे २९ जागांचा फायदा मिळण्याचा अंदाज आहे, तर महाआघाडीला २८ जागा कमी मिळण्याचा अंदाज आहे. पहिल्यांदाच रिंगणात उतरलेल्या प्रशांत किशोर यांच्या जनसुराज्य पक्षाला ३ ते ५ जागा मिळण्याचा अंदाज आहे.
