“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 18:45 IST2025-10-06T18:43:08+5:302025-10-06T18:45:37+5:30
Bihar Assembly Election 2025: बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे.

“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
Bihar Assembly Election 2025: बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. बिहार विधानसभा निवडणुका दोन टप्प्यात होणार आहे. ६ नोव्हेंबर २०२५ आणि ११ नोव्हेंबर २०२५ रोजी मतदान होईल. बिहार विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होताच आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून, विरोधकांनी भाजपा आणि केंद्रीय निवडणूक आयोगावर टीका केली आहे.
इतका निर्लज्ज निवडणूक आयोग कधीच पाहिला नाही. ज्या आयोगाकडून निष्पक्ष राहण्याची अपेक्षा होती, त्या निवडणूक आयोगाने तो आमचा भ्रम होता, हे दाखवून दिले. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी भाजपा मुख्यालयातून पाठवलेला निवडणूक वेळापत्रक फक्त वाचून दाखवले. बिहारमधील प्रत्येक लहान मुलाला माहिती होते की, अपूर्ण मेट्रोच्या उद्घाटनानंतर निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या जातील. आयोगाने त्याची विश्वासार्हता कलंकित केली, अशी टीका पूर्णिया येथील खासदार पप्पू यादव यांनी केली.
अखेर निधी मिळाल्यानंतरच ही घोषणा केली
काँग्रेस नेते पवन खेरा यांनीही केंद्रीय निवडणूक आयोगावर निशाणा साधला. वर्षभर कोणतीही तयारी करण्यात आली नाही. पंतप्रधान मोदी आणि नितीश कुमार यांनी शेवटच्या क्षणी हस्तक्षेप केला आणि त्यानंतरच तारखा निश्चित करण्यात आल्या. निधी पोहोचला नसल्याने मागील पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली नव्हती. अखेर निधी मिळाल्यानंतरच ही घोषणा करण्यात आली, असा दावा काँग्रेस नेत्यांनी केला.
दरम्यान, १४ नोव्हेंबर २०२५ हा दिवस ऐतिहासिक दिवस असल्याचे महाआघाडीचे नेते तेजस्वी यादव यांनी म्हटले आहे. जनतेने सक्रिय सहभागी व्हावे. गेल्या २० वर्षात बिहारमध्ये झालेल्या गुन्हेगारी, भ्रष्टाचार, बेरोजगारी आणि प्रशासकीय अपयशांचा उल्लेख करून तेजस्वी यादव यांनी आश्वासन दिले की, महाआघाडी सरकार पहिल्या दिवसापासून बिहारमध्ये बदल आणि विकासाची एक नवीन गाथा लिहिण्यास सुरुवात करेल, तरुण आणि बेरोजगारांना रोजगार आणि सरकारी नोकऱ्या देण्याचे आश्वासन देईल.