भाजपाला मतदान केल्याने दलितांना मारहाण, आरजेडीवर आरोप, बिहारमधील गोपालगंज येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 09:33 IST2025-11-07T09:32:53+5:302025-11-07T09:33:45+5:30
Bihar Assembly Election 2025: बिहारमधील विधानसभा निवडणुकीसाठी गुरुवारी झालेल्या पहिल्या टप्प्यातील मतदानावेळी मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदानाचा हक्क बजावला. मात्र या मतदानाला गालबोट लागल्याच्या घटनाही काही ठिकाणी घडल्या.

भाजपाला मतदान केल्याने दलितांना मारहाण, आरजेडीवर आरोप, बिहारमधील गोपालगंज येथील घटना
बिहारमधील विधानसभा निवडणुकीसाठी गुरुवारी झालेल्या पहिल्या टप्प्यातील मतदानावेळी मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदानाचा हक्क बजावला. मात्र या मतदानाला गालबोट लागल्याच्या घटनाही काही ठिकाणी घडल्या. दरम्यान, राष्ट्रीय जनता दल पक्षाला मतदान न करता भाजपाला मतदान केल्याचा आरोप करत एका दलित कुटुंबातील काही व्यक्तींना मारहाण करण्यात आल्याची घटना गोपालगंज जिल्ह्यातील वैकुंठपूर विधानसभा मतदारसंघातील बुचेया गावाच घडली आहे.
याबाबत पीडित मतदारांनी दिलेल्या माहितीनुसार, ते काल संध्याकाळी मतदान करून घरी परतत होते. तेव्हा आरजेडीचे समर्थक असलेल्या अखिलेश यादव, विशाल यादव यांच्यासह इतरांनी त्यांना अडवले. तसेच त्यांनी भाजपाला मतदान केल्याचा आरोप करत बेदम मारहाण केली. या मारहाणीमध्ये पिता-पुत्रासह तिघे जण जखमी झाले आहेत. जखमींनी उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर गावातील दलित कुटुंबांमध्ये भीतीचं वातावरण आहे. याशिवाय वैकुंठपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बंगरा आणि महम्मदपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देवकुली येथेही मारहाणीच्या घटना घडल्या.
दरम्यान, एसडीपीओ राजेश कुमार यांनी या मारहाणीच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. वैकुंठपूर विधानसभा मतदारसंघात मतदान संपल्यानंतर तीन वेगवेगळ्या ठिकाणी मारहाणीच्या घटना घडल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच या प्रकरणी पीडितांकडून लेखी तक्रार घेतली जात असून, तिन्ही ठिकाणी आरजेडीच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचं वृत्त आहे. या प्रकरणी तपासानंतर दोषींवर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, या मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार मिथिलेश तिवारी यांनी रुग्णालयात जाऊन पीडितांची भेट घेतली. तसेच आरजेडीचे आमदार प्रेमशंकर यादव यांच्या समर्थकांनी हा हल्ला केल्याचा थेट आरोप केला. आरजेडीच्या आमदारांचा पराभव निश्चित असल्याने त्यांचे समर्थक निराश झाले आहेत, तसेच या नैराश्यातून ते एनडीएच्या कार्यकर्त्यांवर हल्ले करत आहेत, असा आरोप त्यांनी केला.