'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 16:39 IST2025-11-05T16:38:25+5:302025-11-05T16:39:24+5:30
"...मात्र नेहमीच एक मर्यादा पाळायला हवी. सैन्य हा असा विषय आहे, ज्याला कोणत्याही राजकारणात ओढणे योग्य नाही.”

'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
अराजक माजवणे, गोळीबार करणे, अशा गोष्टी आरजेडीच्या संस्कृतीचा भाग आहेत. हे त्याच ९० च्या दशकातील आहेत, ज्याचा उल्लेख आम्ही जंगल राज म्हणून करत आहोत, असे म्हणत केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी आरजेडीवर थेट निशाणा साधला. ते बुधवारी पाटण्यात पत्रकारांसोबत बोलत होते.
राजदवर निशाणा साधताना केंद्रीय मंत्री चिराग पासवान म्हटले, “या पक्षाच्या सभांमध्ये ज्या प्रकारे गोंधळ माजतो, यावरून स्पष्टपणे जाणवते की, त्यांची विचारसरणी आणि कार्यपद्धती अजूनही ९० च्या दशकातीलच आहे. त्यांच्या कार्यक्रमांतून अराजकतेचे वातावरण निर्माण होते. असे लोक सत्तेपासून अजून दूर आहेत, जर चुकून सत्तेत आले, तर बिहारमध्ये दहशत माजवतील.”
राहुल गांधींवर निशाणा -
यानंतर चिराग पासवान यांनी काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनाही निशाण्यावर घेतले. त्यांनी राहुल गांधींच्या भारतीय सैन्यासंदर्भातील एका वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “देशाच्या विरोधी पक्षनेत्याचीच विचारसरणी अशी असेल की, ते आपल्या सैन्यालाच जाती, धर्माच्या आधारावर विभागू पाहत असतील, तर लोकशाहीसाठी यापेक्षा दुसरी दुर्दैवी गोष्ट नाही. जर तुम्हाला इतकीच चिंता आहे, तर सांगा ना, देशाच्या सत्तेवर दीर्घकाळ कोण होते?”
...मात्र नेहमीच एक मर्यादा पाळायला हवी -
पुढे बोलताना पासवान म्हणाले, “जर तुम्हाला खरोखरच सैन्यात जातीनुसार विभागणी करायची होती, तर करायची असती. निवडणुकीच्या काळात समाजात ध्रुवीकरण व्हावे असेच तुम्ही बोलतात. मात्र नेहमीच एक मर्यादा पाळायला हवी. सैन्य हा असा विषय आहे, ज्याला कोणत्याही राजकारणात ओढणे योग्य नाही.”