Bihar Assembly Election 2020 LJP to contest against all JDU candidates but still support BJP | Bihar Assembly Election 2020: बिहार निवडणूक लोजप स्वबळावर लढणार

Bihar Assembly Election 2020: बिहार निवडणूक लोजप स्वबळावर लढणार

- नितीन अग्रवाल 

नवी दिल्ली : लोक जनशक्ती पक्षाने (लोजप) बिहार विधानसभा निवडणूक राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (रालोआ) राहून नव्हे, तर स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला.

पक्षाच्या केंद्रीय संसदीय मंडळाच्या बैठकीत झालेल्या या निर्णयानुसार पक्ष स्वतंत्रपणे लढणार असला तरी रालोआशी मैत्री सोडणार नाही. पक्षाने स्पष्ट केले की, आमचा विरोध नितीश कुमार यांना आहे, भाजपला नाही.

पक्षाचे सरचिटणीस अब्दुल खालीदने सांगितले की, ‘वैचारिक मतभेद असल्यामुळे लोजप ही विधानसभा निवडणूक जनता दलासोबत (यू) न लढता त्याच्या उमेदवारांविरोधात उमेदवार देईल; परंतु भाजपच्या उमेदवारांविरोधात लढणार नाही.’

पक्षाने २०१७ मध्येही हेच सूत्र अवलंबले होते. तेव्हा पक्षाने विधानसभा निवडणुकीत स्वबळावर ११ उमेदवार उतरवले होते. फक्त एक जण निवडून आला. त्याने सरकार बनवण्यासाठी भाजपला पाठिंबा दिला होता. रालोआत असूनही २०१४ मध्ये जम्मू-कश्मीर व २०१९ मध्ये झारखंडमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्ष स्वबळावर लढला होता. जनता दलही (यू) सतत लोजपला विरोध करतो आहे. पासवान यांची ४२ जागांवर निवडणूक लढण्याची इच्छा जनता दलाने (यू) फेटाळली होती. हाच मुद्दा घेऊन पासवान भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा व गृहमंत्री अमित शाह यांनाही अनेकदा भेटले; परंतु काहीही झाले नाही.

‘बिहार फर्स्ट - बिहारी फर्स्ट’ची घोषणा
पक्षाचे नेतृत्व करीत असलेले चिराग पासवान यांनी आधीच म्हटले होते की, आम्ही स्वबळावर राज्यात २४३ जागांपैकी १४३ जागांवर उमेदवार देणार आहोत. रविवारी चिराग पासवान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला की, पक्ष ‘बिहार फर्स्ट - बिहारी फर्स्ट’च्या घोषणेसह निवडणूक लढेल. बैठकीत भाजप-लोजप सरकारचा ठराव संमत केला गेला. त्यानुसार पक्षाचे सगळे आमदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करताना राज्यात भाजप-लोजप सरकार बनवतील.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Bihar Assembly Election 2020 LJP to contest against all JDU candidates but still support BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.