Bihar Assembly Election 2020: Candidate killed during campaign in Bihar, attacker killed by supporters | Bihar Assembly Election 2020 : बिहारमध्ये प्रचारादरम्यान उमेदवाराची हत्या, समर्थकांनी हल्लेखोराला केले ठार

Bihar Assembly Election 2020 : बिहारमध्ये प्रचारादरम्यान उमेदवाराची हत्या, समर्थकांनी हल्लेखोराला केले ठार

पाटणा - बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असताना काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटनाही घडत आहेत. बिहारमधील शिवहर येथे शनिवारी एका उमेदवाराची आणि त्यांच्या एका कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. सदर उमेदवार प्रचाराला निघाला असताना एका हल्लेखोराने त्याच्यावर गोळीबार केला. दरम्यान, या हल्लेखोराला उमेदवाराच्या समर्थकांनी घटनास्थळावरच पकडून जबर मारहाण केली. या मारहाणीत या हल्लेखोराचाही मृत्यू झाला.

शिवहर विधानसभा मतदारसंखात जनता दल राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनारायण सिंह हे शनिवारी प्रचारासाठी गेले होते. त्यावेळी हा प्रकार घडला. श्रीनारायण सिंह हे पुरनहियामधील हथसार गावात लोकांच्या  भेटीगाठी घेत होते. त्याचदरम्यान, दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला. अचानक झालेल्या गोळीबारामुळे घटनास्थळावर पळापळ झाली. दरम्यान, छातीत गोळी घुसल्याने श्रीनारायण सिंह घटनास्थळावरच रक्ताच्या थारोळ्यात पडले.

हल्ला करून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या दुचाकीस्वारावर तिथे उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांच्या जमावाने पकडले. हल्लेखोराला पकडल्यानंतर त्याला बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला.

गंभीर जखमी झालेल्या श्रीनारायण सिंह यांना उपचारांसाठी शिवहर सदर रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्यांना अधिक उपचारांसाठी सीतामढी येथे नेण्यास सांगितले. मात्र तिथे नेत असतानाच श्रीनारायण सिंह यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूच्या वृत्तामुळे कार्यकर्त्यांमध्ये शोकसंतप्त वातावरण आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तपासास सुरुवात केली आहे. शिवहरचे एसडीपीओ राकेश कुमार यांनी सांगितले की, आरोपी हे उमेदवाराचे समर्थक बनून गर्दीत घुसले होते. संधी पाहताच त्यांनी गोळीबार केला. दरम्यान, या प्रकरणात फरार असलेल्यांचा शोध सुरू आहे. मयत श्रीनारायण सिंह हेसुद्धा गुन्हेगारी पार्श्वभूमीचे होते. त्यांच्यावर दोन डझनांहून अधिक गुन्हे दाखल होते.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Bihar Assembly Election 2020: Candidate killed during campaign in Bihar, attacker killed by supporters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.