बिहारमध्ये विजेचे तांडव, दिवसभरात ८३ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2020 19:42 IST2020-06-25T19:25:34+5:302020-06-25T19:42:11+5:30
राज्यातील २३ जिल्ह्यांत वीज कोसळून दुर्घटना घडल्या असून, त्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

बिहारमध्ये विजेचे तांडव, दिवसभरात ८३ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
पाटणा - मान्सूनचे आगमन होत असताना आज बिहारमध्ये विजांच्या कडकडाटाने तांडव केले. राज्यातील विविध भागात वीज कोसळून झालेल्या दुर्घटनांमध्ये सुमारे ८३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. तर उत्तर प्रदेशमध्ये वीज कोसळून झालेल्या अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला आहे.
राज्यातील २३ जिल्ह्यांत वीज कोसळून दुर्घटना घडल्या असून, त्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. सर्वाधिक हानी गोपालगंज जिल्ह्यात झाली असून, इथे वीज कोसळून झालेल्या अपघातांमध्ये १३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर मधुबनी आणि नबादा जिल्ह्यात प्रत्येकी आठ जणांचा मृत्यू झाला आहे.
बिहारमधील आठ जिल्हे असे आहेत जिथे वीज कोसळल्यामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये किमान पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या जिल्ह्यांमध्ये गोपालगंज, पूर्व चंपारण्य, सिवान, बांका, दरभंगा, भागलपूर, मधुबनी आणि नबादा या जिल्ह्यांचा समावेश आहे.
बिहारबरोबरच उत्तर प्रदेशमध्येही आज वीज कोसळल्यामुळे दुर्घटना घडल्या. यामध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला. उत्तर प्रदेशातील देवरिया येथे वीज कोसळून झालेल्या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला. तर सहा जण जखमी झाले. तर बाराबंकी जिल्ह्यात वीज कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले.
इतर महत्त्वाच्या बातम्या