गलवानमध्ये किती सैनिक मारले गेले, सरकारच्या मौनामुळे चिनी नागरिक संतापले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 02:12 PM2020-06-22T14:12:57+5:302020-06-22T14:59:36+5:30

चीनमधील सर्वसामान्य नागरिक गलवानमधील संघर्षात मृत्यूमुखी पडलेल्या आणि जखमी झालेल्या चिनी सैनिकांची माहिती पारदर्शकपणे देण्याची मागणी करत आहेत. तसेच धारातीर्थी पडलेल्या भारतीय जवानांची माहिती जाहीर केल्याने भारताचे कौतुक करत आहेत.

लडाखमधील गलवान खोऱ्यात १५ जूनच्या रात्री भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये हिंसक झटापट झाली होती. या झटापटीत भारताच्या २० जवानांना वीरमरण आले होते. तसेच चीनच्या सैन्याचे देखील मोठे नुकसान झाले होते.

या झटापटीनंतर भारतीय लष्कराने मातृभूमीचे रक्षण करताना धारातीर्थी पडलेल्या जवानांची नावे आणि छायाचित्रे अधिकृतपणे प्रसिद्ध केली होती. दुसरीकडे चीनने मात्र या झटापटीबाबत अद्याप तरी मौन बाळगलेले आहे. तसेच झटापटीत जखमी वा मृत्यू पावलेल्या सैनिकांबाबत कुठलीही अधिकृत वाच्यता केलेली नाही.

दरम्यान, चिनी सरकार आणि सैन्याकडून गलवानमधील संघर्षाबाबत बाळगण्यात आलेल्या मौनामुळे चिनी नागरिकांमध्ये अस्वस्थतेचं वातावरण पसरले आहे. चिनी प्रसारमाध्यमांमध्ये गलवानमधील संघर्षाबाबत फार त्रोटक माहिती दिली गेली आहे त्याबाबतही चिनी नागरिक निराशा व्यक्त करत आहेत.

गलवानमधील हिंसक झटापट आणि चिनी सैन्याला झालेल्या नुकसानीबाबत योग्य माहिती मिळत नसल्याने चिनी नागरिक स्थानिक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून आपल्याच सरकारविरोधात प्रश्न विचारत आहेत. तसेच सरकारच्या कठोर नियमांबाबत नाराजी व्यक्त करत आहेत.

चीनमधील ज्या कुटुंबातील व्यक्ती पीपल्स लिबरेशन आर्मीमध्ये आहेत, अशा कुटुंबांची चिंता वाढली आहे. गलवान खोऱ्यात तैनात असलेल्या चिनी सैनिकांचे मित्र आणि चीनचे सामान्य नागरिक झटापटीबाबत निर्माण करण्यात आलेल्या गोपनीयतेमुळे संभ्रमात आहेत.

१५ जून रोजी झालेल्या झटापटीबाबत शी जिनपिंग यांचे सरकार कुठल्याही अधिकृत वक्तव्यांना दुजोरा देत नाही आहे. तसेच या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडाही सांगत नाही आहे, असा प्रश्न चीनचे नागरिक विचारत आहेत.

भारतातील राष्ट्र्रीय स्तरावरील ऐक्य उच्च स्तरावर आहे. मात्र आमच्याबाबत काय बोलायचे? शहीद जवानांना कसा सन्मान द्यायचे हे आपण भारताकडून शिकले पाहिजे. आपण मृत्युमुखी पडलेल्या सैनिकांना खुलेपणाने सन्मान कधी करणार, पीएलए्च्या एकाही जवानाचा मृत्यू झालेला नाही आहे का? मला माफ करा, असे एकाने सुनावले आहे.

अनेक निर्बंधांमुळे चीनने स्वत:चा असा सोशल मीडिया विकसित केला आहे. वीबो हा प्लॅटफॉर्म चीनमध्ये ट्विटरसारखे काम करतो. गलवानमधील संघर्षाबाबत माहिती मिळवण्यासाठी चिनी नागरिक भारतीय वर्तमानपत्रांमधील लेख, व्हिडीओ यांचा आधार घेत आहे. दरम्यान, गलवानमधील संघर्षाबाबत चीन सरकारकडून कुठलेही अधिकृत वक्तव्य अद्याप समोर आलेले नाही.

भारताने धारातीर्थी पडलेल्या आपल्या जवानांच्या सन्मानार्थ श्रद्धांजली सभा आयोजित केल्या आहेत. भारत देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांप्रति सन्मान बाळगतो आणि त्यांच्याकडे विशेष लक्ष देतो, असे एका वीबो युझरने म्हटले आहे.

चीनमधील सर्वसामान्य नागरिक गलवानमधील संघर्षात मृत्यूमुखी पडलेल्या आणि जखमी झालेल्या चिनी सैनिकांची माहिती पारदर्शकपणे देण्याची मागणी करत आहेत. तसेच धारातीर्थी पडलेल्या भारतीय जवानांची माहिती जाहीर केल्याने भारताचे कौतुक करत आहेत.

पीएलए या चीनच्या सैन्यदलात काम करणाऱ्या सैनिकांवर कुठल्याही प्रकारची माहिती कुटुंबीय किंवा मित्रमंडळीना सांगण्याबाबत कठोर निर्बंध आहेत. मी कालपासून चीन आणि भारतामधील संघर्षाबाबत वाचून मी चिंतीत आहे. या संघर्षात चिनी सैनिकांचा मृत्यू झाला आहे का? कारण कुठलीही विशिष्ट्य आकडेवारी मिळत नाही आहे. आम्ही चिनी सैनिकांच्या बाबतीत चिंतीत आहोत, असे एका तरुणाने विबोवर लिहिले आहे.