बिहारमध्ये मोठा राडा! प्रचाराला आलेल्या तेजप्रताप यादवांवर दगडफेक; तेजस्वींच्या समर्थकांनी हुसकावून लावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 09:35 IST2025-10-30T09:34:40+5:302025-10-30T09:35:14+5:30
Bihar election 2025: बिहार निवडणुकीत तेज प्रताप यादव यांच्या ताफ्यावर RJD समर्थकांनी हल्ला केला. 'तेजस्वी जिंदाबाद'च्या घोषणा. महनार मतदारसंघात RJD उमेदवारावर कट रचल्याचा आरोप.

बिहारमध्ये मोठा राडा! प्रचाराला आलेल्या तेजप्रताप यादवांवर दगडफेक; तेजस्वींच्या समर्थकांनी हुसकावून लावले
पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबातील अंतर्गत संघर्ष आता रस्त्यावर उतरला आहे. राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख तेजस्वी यादव यांचे मोठे बंधू तेज प्रताप यादव यांना RJD च्या संतप्त समर्थकांनी हुसकावून लावल्याची आणि त्यांच्या ताफ्यावर दगडफेक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
तेज प्रताप यादव हे सध्या 'जनशक्ती जनता दल' (JJD) या त्यांच्या नव्या पक्षाच्या उमेदवारांसाठी प्रचार करत आहेत. महनार विधानसभा मतदारसंघात JJD चे उमेदवार जय सिंह राठौर यांच्यासाठी प्रचारसभा संपवून परतत असताना हा प्रकार घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, तेज प्रताप यादव सभेहून परतत असताना, तिथे उपस्थित असलेल्या जमावाने त्यांच्यासमोर 'लालटेन छाप जिंदाबाद' आणि 'तेजस्वी यादव जिंदाबाद' अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. या घोषणाबाजीनंतर जमाव अधिक आक्रमक झाला आणि त्यांनी तेज प्रताप यांच्या गाडीचा काही अंतरापर्यंत पाठलाग केला, तसेच त्यांच्या ताफ्यावर दगडफेकही केली. यामुळे तेज प्रताप यादव यांना घटनास्थळावरून तातडीने माघार घ्यावी लागली.
RJD उमेदवारावर कट रचल्याचा आरोप
या घटनेनंतर JJD उमेदवार जय सिंह राठौर यांनी थेट RJD चे स्थानिक उमेदवार रवींद्र सिंह यांच्यावर कट रचून हा हल्ला घडवून आणल्याचा गंभीर आरोप केला आहे. "RJD च्या गुंडांनी हे कृत्य केले आहे. रवींद्र सिंह यांनी कोट्यवधी रुपयांमध्ये तिकीट विकत घेतले असून, निवडणुकीत तेच अशा धमक्या आणि हल्ले घडवून आणत आहेत," असा आरोप राठौर यांनी केला आहे. बिहार निवडणुकीत दोन्ही भावांमध्ये वाढलेला राजकीय तणाव या घटनेतून पुन्हा एकदा उघड झाला आहे.