आता कितीही धुके असू दे, वेगवान वंदे भारत ट्रेन थांबणार नाही; भारतीय रेल्वेने उचलले मोठे पाऊल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 14:55 IST2025-12-31T14:52:37+5:302025-12-31T14:55:21+5:30
Indian Railway Vande Bharat Train: देशातील अनेक भागांमध्ये धुक्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. परंतु, वंदे भारत ट्रेन वेळेत चालण्यासाठी भारतीय रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

आता कितीही धुके असू दे, वेगवान वंदे भारत ट्रेन थांबणार नाही; भारतीय रेल्वेने उचलले मोठे पाऊल!
Indian Railway Vande Bharat Train: भारतीय रेल्वेसाठी एक मोठा माइल स्टोन ठरलेली वंदे भारत ट्रेन आताच्या घडीला लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. परंतु, गेल्या काही दिवसांत देशातील अनेक भागात मोठ्या प्रमाणावर पडत असलेल्या धुक्यांमुळे वंदे भारत ट्रेन अनेक तास उशिराने धावत असल्याचे पाहायला मिळत आहे. वंदे भारत ट्रेनसह राजधानी, शताब्दी यांसह भारतीय रेल्वेच्या अनेक प्रिमियम, सुपरफास्ट ट्रेनलाही धुक्याचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी आणि संताप तीव्र झाल्याचे पाहायला मिळत आहे. वेगवान वंदे भारत ट्रेनच्या बाबतीत भारतीय रेल्वेने आता मोठा निर्णय घेतला आहे.
रेल्वे वाहतुकीवर धुक्याचा परिणाम कमी करण्यासाठी रेल्वे बोर्डाने अनेक महत्त्वाची पावले उचलली आहेत. प्रवाशांची सोय आणि वेळेवर रेल्वे वाहतूक करण्यासाठी विभागीय पातळीवर देखरेख वाढविण्यात आली आहे. वंदे भारत एक्सप्रेस वेळेवर धावण्यासाठी अतिरिक्त रेकची व्यवस्था करण्यात आली आहे. रेल्वे बोर्डाने उत्तर रेल्वे, ईशान्य रेल्वे आणि उत्तर मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना रेल्वेच्या स्थितीचा प्रत्यक्ष वेळेत आढावा घेण्याचे आणि प्रवाशांशी संबंधित समस्या, ज्यामध्ये खान-पान सेवेचा समावेश आहे, त्या त्वरित सोडवण्याचे निर्देश दिले आहेत. दिल्ली, लखनऊ, मुरादाबाद, वाराणसी आणि प्रयागराज विभागातील विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना ट्रेनचे सतत निरीक्षण करण्यास आणि आवश्यक व्यवस्था करण्यास सांगितले आहे.
वंदे भारत, शताब्दी ट्रेन वेळेवर चालण्यावर भारतीय रेल्वेचा भर
धुक्याच्या काळात रेल्वे ट्रेन वेळेवर धावण्यासाठी वंदे भारत एक्सप्रेस आणि शताब्दी ट्रेनचे अतिरिक्त रेक उपलब्ध करून देण्यात येत आहेत. रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते नवी दिल्ली-वाराणसी सेवा टाइम टेबलप्रमाणे चालवण्यासाठी २० कोच असलेला वंदे भारत रेक वापरला जात आहे. वाराणसी-नवी दिल्ली वंदे भारत सेवा वेळेत चालवण्यासाठी उत्तर रेल्वेकडे उपलब्ध असलेला आणखी २० कोचचा रेक सेवेत आणला गेला आहे. याव्यतिरिक्त, १६ कोचच्या वंदे भारत सेवा वेळेवर चालावी, यासाठी २० कोचचा रेक पश्चिम मध्य रेल्वेकडून उत्तर रेल्वेला पाठवला जात आहे. उशिरा येणाऱ्या ट्रेन वेळेवर सुटण्यासाठी पूर्व मध्य रेल्वे आणि दक्षिण रेल्वे येथे उपलब्ध असलेल्या कोचमधून दोन एसी रेक तयार केले जात आहेत.
दरम्यान, अतिरिक्त रेकसाठी केटरिंगची व्यवस्था आयआरसीटीसी करणार आहे. तर ऑनबोर्ड हाऊसकीपिंग सेवा सुरळीत होण्यासाठीही व्यवस्थापन केले जाणार आहे. रेल्वे बोर्ड स्तरावर ट्रेनच्या संचालनावर निरीक्षण असणार आहे आणि आवश्यक निर्णय रिअल टाइममध्ये घेतले जात आहेत. प्रवाशांना चांगली सेवा देण्यासाठी आयआरसीटीसीमध्ये एक 'वॉर रूम' सक्रिय केला जात आहे. यातून रेल्वे संचालनावर बारीक लक्ष ठेवले जाणार आहे. केटरिंगशी संबंधित समस्या त्वरित सोडवल्या जाणार आहेत.