मॅडम सर्जन निघाली मुजम्मिलची पत्नी; २८ लाख रुपये देऊन स्लीपर सेलला केली मदत, NIA चौकशीत धक्कादायक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 13:36 IST2025-11-27T13:34:08+5:302025-11-27T13:36:12+5:30
एनआयएच्या चौकशीत डॉ. मुजम्मिलने धक्कादायक खुलास करत डॉ. शाहीन बद्दल महत्त्वाची माहिती दिली.

मॅडम सर्जन निघाली मुजम्मिलची पत्नी; २८ लाख रुपये देऊन स्लीपर सेलला केली मदत, NIA चौकशीत धक्कादायक खुलासा
Delhi Blast:दिल्ली कार बॉम्बस्फोट प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या चौकशीदरम्यान अटक करण्यात आलेला दहशतवादी मॉड्यूलचा म्होरक्या डॉ. मुजम्मिल अहमद गनई याने खळबळजनक खुलासा केला आहे. या मॉड्यूलमध्ये 'मॅडम सर्जन' म्हणून ओळखली जाणारी डॉ. शाहीन सईद ही त्याची प्रेयसी नसून त्याची पत्नी असल्याचे समोर आलं. त्याने सप्टेंबर २०२३ मध्ये फरीदाबादमधील अल फलाह युनिव्हर्सिटीजवळ एका मशिदीत तिच्याशी शरिया कायद्यानुसार निकाह केल्याचे मुजम्मिलने कबूल केले आहे. निकाहसाठी ५ ते ६ हजार इतक्या मेहरवर दोघांची सहमती झाली होती.
दहशतवादी मॉड्यूलला २८ लाखांचा 'फायनान्स'
डॉ. शाहीन सईद ही केवळ मुजम्मिलची पत्नी नव्हती, तर जैश-ए-मोहम्मदच्या या स्लीपर सेलला आर्थिक मदत करणारी प्रमुख दुवा होती. शाहीनने या मॉड्यूलला शस्त्रे आणि स्फोटके जमवण्यासाठी एकूण २७ ते २८ लाख रुपये पुरवले. तिने २०२३ मध्ये मुजम्मिलला शस्त्रे खरेदी करण्यासाठी सुमारे ६.५ लाख दिले होते. तसेच २०२४ मध्ये डॉ. उमर नबी या दहशतवाद्याला फोर्ड इकोस्पोर्ट कार खरेदी करण्यासाठी ३ लाख कर्ज म्हणून देण्याची ऑफरही दिली होती.
काश्मीरी फळांच्या व्यापाराच्या नावाखाली तिसरा अड्डा
मुजम्मिलने दहशतवादी कारवायांसाठी फरीदाबादमध्ये अनेक ठिकाणी तळ ठोकले होते. फतेहपूर तगा आणि धौज येथील ठिकाणांनंतर त्याचे तिसरे ठिकाण खोरी जमालपूर गावात होते. अल फलाहपासून ४ किमी दूर असलेल्या या गावात मुजम्मिलने माजी सरपंच जुम्मा यांच्याकडून तीन बेडरूमचा एक फ्लॅट भाड्याने घेतला होता. मुजम्मिलने माजी सरपंचांना काश्मीरमधून फळे आणून विकण्याचा व्यवसाय करणार आहे, असे सांगत घर भाड्याने घेतले होते. एप्रिल ते जुलै २०२५ या तीन महिन्यांदरम्यान मुजम्मिलने हा फ्लॅट ८ हजार रुपयांनी भाड्याने घेतला होता.
माजी सरपंचांने दिलेल्या माहितीनुसार, घर भाड्याने घेताना डॉ. शाहीनही मुजम्मिलसोबत होती आणि त्याने ती कुटुंबातील सदस्य असल्याचे सांगितले. या तीन महिन्यांत मुजम्मिल शाहीनला अनेकदा त्या भाड्याच्या घरात घेऊन आला होता. सरपंचांची मुजम्मिल आणि उमर नबी यांच्याशी ओळख त्याच्या पुतण्याच्या कर्करोगाच्या उपचारादरम्यान अल फलाह रुग्णालयात झाली होती.
उमर नबीला येत होत्या नऊ भाषा
मुजम्मिलने दिलेल्या माहितीनुसार, या मॉड्यूलमध्ये असलेला डॉ. उमर नबी हा अत्यंत गर्विष्ठ आणि ज्ञानी होता. तो स्वतःला आमिर म्हणवून घ्यायचा, ज्याचा अर्थ राजकुमार किंवा सेनापती असा होतो. मुजम्मिलने सांगितले की, उमर स्वतःला एक शासक मानत असे आणि इतरांपेक्षा जास्त हुशार समजत असे. उमरला हिंदी, उर्दू, इंग्रजी, पर्शियन, अरबी, चायनीज, फ्रेंचसह नऊहून अधिक भाषांचे ज्ञान होते. तो इतका हुशार होता की तो एक शास्त्रज्ञ बनू शकला असता, असे मुजम्मिलने सांगितले.