लंडनहून बेंगळुरूला येणाऱ्या एअर इंडियाच्या बोइंग ७८७ ड्रीमलाइनर विमानाच्या फ्यूल कंट्रोल स्विचमध्ये बिघाड झाल्याच्या तक्रारीनंतर हवाई क्षेत्रात खळबळ उडाली होती. मात्र, नागरी विमान महासंचालनालयाने या विमानाच्या तपासणीनंतर एक मोठा खुलासा केला आहे. तपासणीत फ्यूल कंट्रोल स्विचमध्ये कोणतीही तांत्रिक त्रुटी आढळली नसल्याचे सांगत मंत्रालयाने या विमानाला 'क्लीन चिट' दिली आहे.
नेमकं काय घडलं होतं?
रविवारी लंडनच्या हिथ्रो विमानतळावरून एअर इंडियाच्या (एआय १३२) विमानाने उड्डाण केले. उड्डाणानंतर काही वेळातच विमानातील डाव्या इंजिनचा फ्यूल कंट्रोल स्विच आपोआप कटऑफ मोडवर गेला. वैमानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी हा स्विच दोनदा रन मोडवर आणला, पण तो पुन्हा पुन्हा कटऑफवर जात होता. अखेर तिसऱ्या प्रयत्नात तो लॉक झाला. हा स्विच इंजिनला होणारा इंधन पुरवठा नियंत्रित करतो. जर तो कटऑफ झाला, तर हवेतच इंजिन बंद पडण्याचा धोका असतो.
मंत्रालयाने काय म्हटले?
बेंगळुरूमध्ये लँडिंग केल्यानंतर या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात आली. डीजीसीएने स्पष्ट केले की, स्विचमध्ये कोणतीही प्रत्यक्ष खराबी सापडलेली नाही. इंजिन चालू असताना किंवा इतर कोणत्याही वेळी यंत्रणेने वॉर्निंग किंवा 'कॉशन' दिलेले नाही. असे असले तरी, सुरक्षेचा उपाय म्हणून एअर इंडियाने आपल्या ताफ्यातील सर्व ड्रीमलाइनर विमानांच्या फ्यूल स्विचची पुन्हा एकदा तपासणी सुरू केली आहे.
अहमदाबाद अपघाताच्या आठवणी जाग्या!
१२ जून २०२५ रोजी अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघातात २६० प्रवाशांचा मृत्यू झाला होता. त्या भीषण अपघातामागेही फ्यूल कंट्रोल स्विचमधील बिघाड हेच प्रमुख कारण असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले होते. त्यामुळेच आता लंडन-बेंगळुरू विमानात घडलेल्या प्रकारामुळे वैमानिक संघटना आक्रमक झाल्या आहेत. बोइंग ७८७ विमानांच्या इलेक्ट्रिकल सिस्टीममध्ये काही तरी गंभीर दोष आहे का, याची तातडीने चौकशी करण्याची मागणी कॅप्टन सी. एस. रंधावा यांनी केली आहे.
काय असतो फ्यूल कंट्रोल स्विच?
सोप्या भाषेत सांगायचे तर, हे विमानाचे असे बटण आहे जो इंजिनला डिझेल/पेट्रोल पुरवतो. बोइंग ७८७मध्ये दोन इंजिनसाठी दोन स्विच असतात. जर, हा स्विच चुकून कटऑफ झाला, तर इंजिनला इंधन मिळणे बंद होते आणि विमान कोसळण्याचा धोका निर्माण होतो. एअर इंडियाने आता या विषयावर बोइंग कंपनीकडे स्पष्टीकरण मागितले आहे. तोपर्यंत वैमानिकांना उड्डाणापूर्वी सर्व तांत्रिक चाचण्या काटेकोरपणे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
Web Summary : Air India's Dreamliner fuel switch issue investigated after a mid-air scare. DGCA found no fault, but pilots remain concerned, recalling a past fatal crash. Air India is rechecking all Dreamliner fuel switches.
Web Summary : एयर इंडिया के ड्रीमलाइनर में ईंधन स्विच की समस्या की जांच की गई। डीजीसीए को कोई खराबी नहीं मिली, लेकिन पायलट चिंतित हैं, उन्हें एक घातक दुर्घटना याद आ गई। एयर इंडिया सभी ड्रीमलाइनर ईंधन स्विच की दोबारा जांच कर रही है।