मोठी बातमी! आर्मी कॅंपवर भूस्खलन, 7 जवानांचा मृत्यू तर 30 ते 40 अजूनही मातीखाली अडकले
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2022 15:15 IST2022-06-30T15:14:57+5:302022-06-30T15:15:45+5:30
मणिपूर राज्यामध्ये अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे दरड कोसळण्याच्या घटना समोर येत आहेत.

मोठी बातमी! आर्मी कॅंपवर भूस्खलन, 7 जवानांचा मृत्यू तर 30 ते 40 अजूनही मातीखाली अडकले
इंफाळ: मणिपूर राज्यामध्ये अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे दरड कोसळण्याच्या घटना समोर येत आहेत. नोनी जिल्ह्यातील तुपुल रेल्वे स्थानकाजवळ बुधवारी रात्री 107 प्रादेशिक लष्करी(टेरिटोरियल आर्मी) छावणी भूस्खलनाच्या तडाख्यात आली. या अपघातात 30-40 जवान मातीत गाडले गेले.
7 जणांचा मृत्यू
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या घटनेत आतापर्यंत 7 जवानांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, तर 13 जवानांना वाचवण्यात यश आले आहे. 30-40 पेक्षा जास्त अजूनही मातीखाली असल्याची माहिती आहे. मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी याबाबत तातडीची बैठक बोलावली आहे. जखमींच्या मदतीसाठी डॉक्टरांचे पथक घटनास्थळी रवाना झाले आहे.
सर्वसामान्यांनाही फटका
जखमींना नोनी आर्मी मेडिकल युनिटमध्ये उपचारासाठी आणण्यात आले आहे. दरड कोसळल्याने इझाई नदीच्या प्रवाहावर परिणाम झाला आहे. ही नदी तामेंगलाँग आणि नोनी जिल्ह्यातून वाहते. वृत्तानुसार, काही नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, लष्कराचे हेलिकॉप्टरही घटनास्थळी पोहोचले आहे. पण, खराब हवामानामुळे बचाव मोहिमेत अडचणी येत आहेत.
या भागात विनाशाचा धोका
जिल्हा प्रशासनाने जवळच्या गावकऱ्यांना खबरदारी घेण्याचा आणि लवकरात लवकर जागा रिकामी करण्याचा सल्ला दिला आहे. मातीमुळे इजाई नदीचे पाणी एकाच ठिकाणी साचले आहे, यामुळे धरण सदृश्य परिस्थितीही निर्माण झाली आहे. तो फुटला तर सखल भागात आणखी विध्वंस होण्याची शक्यता आहे. आसाम, मणिपूरसह अनेक ईशान्येकडील राज्यांमध्ये संततधार पावसाने पूरस्थिती निर्माण केली आहे. आसाममध्ये 10 दिवसांत आतापर्यंत 135 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर लाखो लोक बाधित झाले आहेत. हवामान खात्यानुसार, अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर आणि सिक्कीममध्ये आणखी पाऊस पडण्याची शक्यता आहे.