पुतिन भारतात पोहोचण्यापूर्वीच मोठी बातमी येऊन धडकली, 2 अब्ज डॉलरच्या डीलवर शिक्कामोर्तब; पाक-चीनची झोप उडणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 18:50 IST2025-12-04T18:48:28+5:302025-12-04T18:50:41+5:30
या करारासंदर्भात गेल्या १० वर्षांपासून चर्चा सुरू होती...

पुतिन भारतात पोहोचण्यापूर्वीच मोठी बातमी येऊन धडकली, 2 अब्ज डॉलरच्या डीलवर शिक्कामोर्तब; पाक-चीनची झोप उडणार!
रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर भारत दौऱ्यावर येत आहेत. मात्र ते दिल्लीत पोहचण्यापूर्वीच एक मोठी बातमी येऊन धडकली आहे. भारत आणि रशिया यांच्यात एक मोठा संरक्षण करार झाला आहे. भारत आणि रशियादरम्यान अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीसाठी अर्थात न्यूक्लियर सबमरीनसाठी सुमारे २ अब्ज डॉलर्सच्या (जवळपास १६७०० कोटी रुपये) करारावर अंतिम शिक्कामोर्तब झाले आहे. या करारासंदर्भात गेल्या १० वर्षांपासून चर्चा सुरू होती.
नौदल प्रमुख दिनेश के त्रिपाठी यांनी दिलेल्या माहितीनुसार, "भारताला ही पाणबुडी २०२७ पर्यंत मिळणे अपेक्षित आहे. रशियाकडून भारताला मिळणारी ही दुसरी अणुपाणबुडी असेल. यापूर्वी, भारताने २०१२ मध्ये 'आयएनएस चक्र' ही पाणबुडी १० वर्षांच्या भाडेपट्टीवर घेतली होती.
चीन-पाकिस्तानची झोप उडणार -
अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुड्या डिझेल-इलेक्ट्रिक पाणबुड्यांच्या तुलनेत प्रचंड सरस असतात. त्या आकारमानाने मोठ्या, अधिक शांत असतात आणि जास्त काळ पाण्याखाली राहू शकतात. महत्वाचे म्हणजे, शांत असल्याने शत्रूला त्यांचा शोध घेणे कठीण होते. हिंदी आणि प्रशांत महासागराच्या विशाल प्रदेशात गस्त घालताना या पाणबुडीचा शोध घेणे कठीण असल्याने चीन आणि पाकिस्तानची झोप उडणार आहे.
भारतही तयार करतोय अणुऊर्जेवर चालणाऱ्या अटॅक सबमरीन -
भारत स्वतःही अणुऊर्जेवर चालणाऱ्या अटॅक सबमरीन (Attack Submarine) बनवण्याची तयारी करत आहे. सध्या अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, चीन आणि रशिया या मोजक्याच देशांकडे अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुड्या तैनात करण्याची आणि चालवण्याची क्षमता आहे.
नौदल प्रमुखांनी म्हटले आहे की, भारताची तिसरी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी पुढील वर्षी नौदलात सामील होणे अपेक्षित आहे. याशिवाय, ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, भारत दोन अणुऊर्जेवर चालणाऱ्या आणि हल्ला करणाऱ्या पाणबुड्यांचीही निर्मिती करत आहे.