Big Breaking: Congress decides to support Shiv Sena? | Big Breaking: : शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत काँग्रेस मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Big Breaking: : शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत काँग्रेस मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

जयपूर/मुंबई - एकीकडे भाजपा आणि शिवसेनेमधील मतभेद विकोपाला गेले असताना राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी बातमी आली आहे. भाजपाला रोखण्यासाठी काँग्रेस शिवसेनेला बाहेरून पाठिंबा देण्याच्या निर्णयापर्यंत आली आहे. जयपूर येथे सुरू असलेल्या काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार आणि ज्येष्ठ नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीत बहुतांश आमदारांनी भाजपाला रोखण्यासाठी शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत अनुकूलता दर्शवली आहे. 

काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार आणि पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये आज जयपूरमध्ये बैठक सुरू आहे. या बैठकीत राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली. यावेळी भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सर्वांमध्ये एकमत झाले. या बैठकीला उपस्थित असलेल्या बहुतांश आमदारांनी शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत सहमती दर्शवली. मात्र सद्यस्थितीत याबाबत अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यात होणाऱ्या बैठकीमध्ये याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. 

दरम्यान, शिवसेनेला बाहेरून पाठिंबा देण्याच्या निर्णयाबाबत काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्यांकडे विचारणा केली असता त्यांनी अद्याप कुठलाही अंतिम निर्णय झाला नसल्याचे सांगितले. आज संध्याकाळी दिल्लीहून दोन निरीक्षक येत आहेत, ते सगळ्या आमदारांशी बोलतील, नेत्यांशी बोलतील आणि दिल्लीत सोनिया गांधींना अहवाल देतील,  त्यानंतर याबाबत अंतिम निर्णय होईल, असे या ज्येष्ठ नेत्यांनी सांगितले. 


काँग्रेसने शिवसेनेबाबत घेतलेल्या भूमिकेमुळे राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सुटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यामुळे राज्यात येत्या काळात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यातील महाशिवआघाडीचे सरकार सत्तेवर येण्याचे संकेत मिळू लागले आहेत. दरम्यान, आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना नेते संजय राऊत यांनीही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे कौतुक केले होते. तसेच काँग्रेस ही काही राज्याची दुश्मन नसल्याचेही सांगितले होते. ''राज्यात स्थिर सरकार यावे, अशी काँग्रेसची भूमिका आहे. काँग्रेस ही काही राज्याची दुश्मन नाही आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राज्याच्या विकासात योगदान दिले आहे. आमच्यात काही प्रश्नांवरून मतभेद आहेत. तसे ते भाजपासोबतही आहेत. देशासंबंधीच्या काही प्रश्नांबाबत भाजपा आणि आमची भूमिका वेगवेगळी होती.'' असे संजय राऊत यांनी सांगितले. 

Web Title: Big Breaking: Congress decides to support Shiv Sena?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.