काँग्रेसला पुन्हा मोठा धक्का? कमलनाथ मुलासह दिल्लीला रवाना; भाजप प्रवेशाच्या चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2024 02:17 PM2024-02-17T14:17:31+5:302024-02-17T14:19:08+5:30

कमलनाथ हे छिंदवाडा येथील आपले पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द करत मुलासह अचानक दिल्लीला रवाना झाले आहेत.

Big blow to Congress again Kamal Nath leaves for Delhi with son likely to join BJP | काँग्रेसला पुन्हा मोठा धक्का? कमलनाथ मुलासह दिल्लीला रवाना; भाजप प्रवेशाच्या चर्चा

काँग्रेसला पुन्हा मोठा धक्का? कमलनाथ मुलासह दिल्लीला रवाना; भाजप प्रवेशाच्या चर्चा

Congress Kamal Nath ( Marathi News ) : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आता ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ हेदेखील मुलगा नकुलनाथ यांच्यासह भाजपचे कमळ हाती घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण कमलनाथ हे छिंदवाडा येथील आपले पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द करत मुलासह अचानक दिल्लीला रवाना झाले आहेत. दिल्लीत ते भाजपच्या प्रमुख नेत्यांची भेट घेतील, असे समजते.

नुकत्याच झालेल्या मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता. काँग्रेसने ही निवडणूक कमलनाथ यांच्याच नेतृत्वाखाली लढवली होती. पक्षाला मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागल्याने कमलनाथ यांना काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद सोडावं लागलं. काँग्रेस नेतृत्वाने विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या जीतू पटवारी यांना प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. त्यामुळे कमलनाथ हे नाराज झाल्याची चर्चा होती. तसंच त्यांचे पुत्र आणि काँग्रेस खासदार नकुलनाथ हेदेखील भाजप प्रवेशास आग्रही असल्याची मध्य प्रदेशच्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे. अशातच पिता-पुत्र अचानक दिल्लीला रवाना झाल्याने याबाबतच्या चर्चांनी आणखीनच वेग पकडला आहे.

काँग्रेसबद्दल काही दिवसांपूर्वी काय म्हणाले होते कमलनाथ?

कमलनाथ यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू असताना त्यांनी काही दिवसांपूर्वी एक्सवर एक पोस्ट लिहीत काँग्रेसच्या विचारधारेचा जयजयकार केला होता. "काँग्रेसची विचारधारा सत्य, धर्म आणि न्यायाची विचारधारा आहे. देशातील सर्व धर्म, जाती, प्रदेश, भाषा आणि विचारांना काँग्रेसच्या विचारधारेत समान स्थान आहे. काँग्रेसच्या १३८ वर्षांच्या इतिहासातील बहुतांश काळ हा संघर्ष आणि सेवेत गेला आहे. स्वातंत्र्याच्या आंदोलनावेळी हुकूमशाहीविरोधात संघर्ष करण्यासाठी काँग्रेस नेत्यांमध्ये स्पर्धा लागली होती. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर राष्ट्रनिर्माण करणं हेच काँग्रेसचं एकमेव ध्येय आहे. आज जेव्हा देशात विरोधी पक्षाला कमकुवत करण्याचा प्रयत्न होत आहे तेव्हा काँग्रेसचीच विचारधारा हुकूमशाहीचा विरोध करणार आहे आणि देशाला जगातील सर्वांत सुंद आणि मजबूत लोकशाही बनवणार आहे. आम्ही गांधी, नेहरू आणि आंबेडकर यांच्या मार्गाने चालत बलशाली भारत निर्माण करू," असं कमलनाथ यांनी म्हटलं होतं.
 

Web Title: Big blow to Congress again Kamal Nath leaves for Delhi with son likely to join BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.