बिहार विजयाचे BJPचे स्वप्न धुसर होणार? बड्या मित्रपक्षाचा NDAला रामराम; INDIA आघाडीत जाणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 23:32 IST2025-04-14T23:31:38+5:302025-04-14T23:32:41+5:30
Bihar Assembly Election 2025 Politics: २०१४ पासून एनडीचे निष्ठावंत सहकारी होतो. आमच्यावर सातत्याने अन्याय झाला. परंतु, आजपासून आमचा आणि एनडीएचा कोणताही संबंध नाही. बिहारमधील सर्व जागांसाठी चाचपणी सुरू केली असून, आम्ही स्वतंत्रपणे निवडणुका लढवू, अशी माहिती देण्यात आली.

बिहार विजयाचे BJPचे स्वप्न धुसर होणार? बड्या मित्रपक्षाचा NDAला रामराम; INDIA आघाडीत जाणार!
Bihar Assembly Election 2025 Politics:बिहार विधानसभा निवडणुकीला आता काहीच महिन्यांचा अवधी आहे. भाजपाने पूर्वीपासूनच बिहार निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केल्याचे सांगितले जात आहे. विद्यामान मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह अन्य पक्षांसोबत भाजपा आगामी बिहार विधानसभा निवडणुकीला सामोरा जाणार आहे. परंतु, असे असले तरी जास्तीत जास्त जागा जिंकून मित्रपक्षांना शह देण्याची रणनीती भाजपा बिहारमध्येही वापरण्याची शक्यता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. अशातच राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच NDA मधून बाहेर पडण्याचा निर्णय एका मित्रपक्षाने घेतला आहे. तसेच इंडिया आघाडीसोबत जाण्याचा विचारही बोलून दाखवला आहे.
राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टी (रालोजपा) चे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री पशुपती कुमार पारस यांनी मोठी घोषणा केली आहे. मीडियाशी बोलताना पशुपति पारस यांनी सांगितले की, सन २०१४ पासून आतापर्यंत एनडीएमध्ये होतो. एनडीएचा एक निष्ठावंत घटकपक्ष आणि सहकारी म्हणून काम केले. जेव्हा लोकसभा निवडणुका झाल्या, तेव्हा एनडीएने आमच्या पक्षावर अन्याय केला, कारण तो दलितांचा पक्ष आहे. तरीही राष्ट्रीय हितासाठी आमच्या पक्षाने निवडणुकीत एनडीएला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. ६ ते ८ महिन्यांनंतर जेव्हा बिहारमध्ये एनडीएची बैठक होते, तेव्हा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि जेडीयूचे प्रदेशाध्यक्ष बिहारमध्ये '५ पांडव' असल्याचे विधान करतात. त्यात ते आमच्या पक्षाचे नाव कुठेही घेत नाहीत. आता शेवटी एनडीएतून बाहेर पडणे आम्हाला भाग आहे. आम्हाला भाग पाडले गेले, अशी खंत पशुपति पारस यांनी बोलून दाखवली.
आम्ही सर्व २४३ जागांसाठी तयारी करत आहोत
आम्ही लोकांमध्ये जात आहोत आणि सदस्यता मोहीम सुरू केली आहे. आम्ही सर्व २४३ जागांसाठी तयारी करत आहोत. इंडिया आघाडीसह महागठबंधनने योग्य वेळी, आम्हाला योग्य सन्मान दिला तर आम्ही भविष्यात त्यांच्या सोबत जाण्याबाबत नक्कीच विचार करू, असे स्पष्ट संकेतही पशुपति पारस यांनी दिले. तसेच पक्षाचे कार्यकर्ते गावागावात जाऊन पक्ष संघटना मजबूत करणार आहेत. जो पक्ष येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्हाला योग्य सन्मान देईल, त्यांच्यासोबत आम्ही जाऊ, त्यासंदर्भात आम्ही पक्षाचे सर्व नेते एकत्र येऊन निर्णय घेऊ, कोणासोबत युती करायची हे अजून निश्चित केलेले नाही. मात्र आम्ही स्वतंत्रपणे निवडणुकीची तयारी सुरू केली आहे, असेही पारस यांनी नमूद केले.
दरम्यान, पशुपति पारस यांच्या या निर्णयानंतर भाजपासह एनडीए आणि चिराग पासवान यांच्यासमोरील आव्हान वाढणार असल्याचे बोलले जात आहे. तत्पूर्वी, वक्फ सुधारणा कायदा २०२५ ला विरोध करताना पशुपति पारस यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली होती. पारस म्हणाले होते की, पंतप्रधान मोदींना ४०० जागा मिळाल्या असत्या, तर त्यांनी संविधान बदलले असते. आता ते बहुमतात नसल्याने, देशात अशांतता पसरवण्यासाठी वक्फ सुधारणा कायदा आणण्यात आला आहे. आम्ही सुरुवातीपासूनच वक्फ कायद्यातील बदलांना विरोध करत आहोत, असे पारस यांनी म्हटले होते.