'सिरम' इन्स्टिट्युटची मोठी घोषणा; भारतासह गरीब देशांना आणखी दहा कोटी डोसचा पुरवठा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2020 17:27 IST2020-09-29T17:26:24+5:302020-09-29T17:27:33+5:30
जगातील सर्व देश, आरोग्य व आर्थिक संस्थांनी एकत्रित येत प्रत्येकापर्यंत लस पोहचविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत..’

'सिरम' इन्स्टिट्युटची मोठी घोषणा; भारतासह गरीब देशांना आणखी दहा कोटी डोसचा पुरवठा
पुणे : बिल अॅन्ड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन व जीएव्हीआय या संस्थेसोबत झालेल्या करारानुसार सिरम इन्स्टिट्युटकडून भारतासह अन्य गरीब देशांना कोरोना लसीचे आणखी दहा कोटी डोस पुरविले जाणार आहेत. या देशांना यापुर्वीही दहा कोटी डोस पुरविण्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे एकुण २० कोटी डोसचा पुरवठा ‘सिरम’कडून या देशांना होणार आहे.
भारतासह जगभरातील ९२ देशांना ‘जीएव्हीआय’कडून लसीकरणासाठी सहकार्य केले जाणार आहे. या देशांमध्ये कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी बिल अॅन्ड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनने पहिल्या टप्यात सुमारे अकराशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. आता आणखी ११०० कोटी रुपये देत लसीकरणासाठी मोठा वाटा उचलला आहे. त्याअंतर्गत सिरम इन्स्टिट्युटशी करार करण्यात आला आहे. त्यानुसार संस्थेने या देशांना १० कोटी लसींचे डोस पुरविण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. आता आणखी १० कोटी डोसची भर टाकण्यात आली असल्याची माहिती ‘सिरम’कडून देण्यात आली. हे डोसही पुर्वी जाहीर केल्याप्रमाणे प्रति डोस सुमारे २२५ रुपयांना दिले जाणार आहेत. अॅस्टॉझेनेका आणि नोव्हावॅक्स दोन कंपन्यांच्या लसींचा पुरवठा होणार आहे. अॅस्ट्राझेनेकाची कोविशिल्ड ही लस यशस्वी ठरल्यास ६१ देशांना आणि नोव्हावॅक्सची परिणामकारकता सिध्द झाल्यास सर्व ९२ देशांमध्ये लसीचे वितरण केले जाणार आहे.
याविषयी सिरम इन्स्टिट्युटचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाले, जीएव्हीआय आणि गेट्स फाऊंडेशनच्या सहकार्यामुळे भारतासह अन्य अल्प व मध्यम आर्थिक गटातील देशांना २०२१ मध्ये आणखी १० कोटी डोसचे उत्पादन व वितरण केले जाईल. जगातील सर्व देश, आरोग्य व आर्थिक संस्थांनी एकत्रित येत प्रत्येकापर्यंत लस पोहचविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.’
------------------