भारत सरकारची मोठी घोषणा! 'अशा' व्यक्तीच्या पत्नी किंवा आई वडिलांना आयुष्यभर मोफत रेल्वे प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 16:09 IST2026-03-26T16:08:27+5:302026-03-26T16:09:22+5:30
कोविड-१९ महामारीपूर्वी रेल्वेमध्ये सुमारे ५० श्रेणींमध्ये सवलतीचा प्रवास उपलब्ध होता. यामध्ये ज्येष्ठ नागरिक आणि इतर अनेक व्यक्तींचा समावेश होता.

भारत सरकारची मोठी घोषणा! 'अशा' व्यक्तीच्या पत्नी किंवा आई वडिलांना आयुष्यभर मोफत रेल्वे प्रवास
नवी दिल्ली - सैन्यात मेडल अथवा पुरस्कार मिळणाऱ्या व्यक्तीला आणि त्याच्या पत्नीला रेल्वे प्रवासात काही श्रेणीत मोफत प्रवासाचा लाभ मिळणार आहे. सरकारकडून रेल्वेला याबाबत निर्देश जारी करण्यात आले आहेत. कोरोनाच्या आधीपर्यंत रेल्वे प्रवासात अनेक श्रेणींमध्ये सवलती किंवा सूट मिळत होती पण त्यानंतर ते मर्यादित करण्यात आले.
ANI या वृत्तसंस्थेने एका संरक्षण अधिकाऱ्याच्या हवाल्याने ही बातमी दिली आहे. भारत सरकारने एक आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार, लष्कर, नौदल, वायुसेनेच्या शौर्य पदकाचे मानकरी आणि त्यांच्या जोडीदारांना (विधुरांना त्यांच्या पुनर्विवाहापर्यंत) एका सहप्रवाशासह भारतीय रेल्वेच्या गाड्यांमध्ये आयुष्यभर मोफत प्रवास करण्याचा हक्क असेल. ज्यांना मरणोत्तर पुरस्कार मिळाला आहे आणि त्यावेळी ते अविवाहित होते त्यांच्या पालकांना एका सहप्रवाशासह भारतीय रेल्वेच्या गाड्यांमध्ये आयुष्यभर मोफत प्रवास करण्याचा हक्क असेल. याचा लाभ फर्स्ट क्लास/२ एसी/एसी चेअर कारमधील प्रवासासाठी मिळेल.
भारत सरकार ने एक ऑर्डर जारी किया है। इसके तहत सेना/नौसेना/वायुसेना मेडल वीरता पुरस्कार पाने वालों/उनके जीवनसाथी (विधवाओं/विधुरों को उनके पुनर्विवाह तक)/अविवाहित मरणोपरांत पुरस्कार विजेताओं के माता-पिता को भारतीय रेलवे की ट्रेनों में फर्स्ट क्लास/2 AC/AC चेयर कार में एक साथी के… pic.twitter.com/5zoBIFkViZ
— ANI_HindiNews (@AHindinews) March 26, 2026
पूर्वी सवलतीत प्रवासाचा मिळायचा लाभ
कोविड-१९ महामारीपूर्वी रेल्वेमध्ये सुमारे ५० श्रेणींमध्ये सवलतीचा प्रवास उपलब्ध होता. यामध्ये ज्येष्ठ नागरिक आणि इतर अनेक व्यक्तींचा समावेश होता. परंतु कोविड-१९ महामारीच्या काळात ही सवलत रद्द करण्यात आली. नंतर काही सवलती पुन्हा सुरू करण्यात आल्या, परंतु त्यांची संख्या पूर्वीपेक्षा खूपच कमी आहे.
दरम्यान, भारतीय सैन्यातील शौर्य पुरस्कार हे सैनिकांनी दाखवलेल्या अतुलनीय धाडस, शौर्य आणि बलिदानासाठी दिले जातात. यात २ प्रकार असतात. पहिला युद्धकाळातील शौर्य पुरस्कार, जे शत्रूसमोर लढल्याने दिले जातात. त्यात परमवीर चक्र, महावीर चक्र, वीर चक्र यांचा समावेश असतो. तर दुसरा शांतताकाळातील शौर्य पुरस्कार जे युद्ध नसताना दहशतवादविरोधी कारवाई किंवा बचावकार्यासाठी दिले जाते. यात अशोक चक्र, किर्ती चक्र, शौर्य चक्र यांचा समावेश असतो.