अयोध्येमधील राममंदिराचे भूमिपूजन ३ किंवा ५ ऑगस्टला; पंतप्रधान मोदींच्या हस्ते समारंभ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2020 01:53 AM2020-07-19T01:53:25+5:302020-07-19T06:07:59+5:30

साडेतीन वर्षांत पूर्ण करण्याचा विचार

Bhumi Pujan of Ram Mandir in Ayodhya on 3rd or 5th August | अयोध्येमधील राममंदिराचे भूमिपूजन ३ किंवा ५ ऑगस्टला; पंतप्रधान मोदींच्या हस्ते समारंभ

अयोध्येमधील राममंदिराचे भूमिपूजन ३ किंवा ५ ऑगस्टला; पंतप्रधान मोदींच्या हस्ते समारंभ

googlenewsNext

अयोध्या : अयोध्येतील प्रस्तावित राममंदिराचे भूमिपूजन ३ किंवा ५ ऑगस्टला पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्याचा निर्णय रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाने घेतला. तसे निमंत्रण न्यासाने पंतप्रधानांना पाठविले आहे. कोणत्या दिवशी भूमिपूजन करायचे याचा अंतिम निर्णय पंतप्रधान कार्यालय घेईल.

कोरोना वा लॉकडाऊनचे अडथळे न आल्यास भूमिपूजनानंतर साडेतीन वर्षांत मंदिराचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या सुमारे दोन तास चाललेल्या बैठकीला राममंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्र यांच्यासह ट्रस्टचे बारा सदस्य उपस्थित होते. तर अन्य तीन सदस्य व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी झाले होते. (वृत्तसंस्था)

राममंदिराच्या उभारणीशी संबंधित सर्व प्राथमिक कामे पार पडल्यानंतर देशभरातील १० कोटी कुटुंबांकडून देणगी गोळा करून या मंदिराचे काम सुरू करण्यात येईल. रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची बैठक होण्याच्या आधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह डॉ. कृष्ण गोपाल यांनी अयोध्या येथे जाऊन मंदिर उभारणीच्या कार्यात सहभागी असलेले विश्व हिंदू परिषदेचे नेते व साधूसंतांशी चर्चा केली.

पाच घुमट बांधणार

रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सदस्य कामेश्वर चौपाल यांनी सांगितले की, प्रस्तावित राममंदिराच्या मूळ आराखड्यात काही बदल करण्यात येणार आहेत. मंदिराचे आता एकूण पाच घुमट असतील. तसेच मंदिराची लांबी, रुंदी व उंची वाढणार आहे.

बाबरी मशीद पक्षकाराचा पाठिंबा

रामजन्मभूमी खटल्यात सर्वोच्च न्यायालयामध्ये बाबरी मशिदीची बाजू घेऊन लढणारे पक्षकार इक्बाल अन्सारी यांनी सांगितले की, राममंदिराचे भूमिपूजन करायला पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत आल्यास मी त्यांचे स्वागत करणार आहे.

भव्य मंदिर उभे राहावे, ही साधूसंतांप्रमाणे माझीही इच्छा आहे. अयोध्येपासून काही अंतरावर मशीद बांधण्यासाठी सुप्रीम कोर्टाने जी पाच एकर पर्यायी जमीन दिली आहे, त्यावर एक शाळा व रुग्णालय बांधावे, अशी मागणी इक्बाल अन्सारी यांनी केली. महासचिव चंपत राय म्हणाले, मंदिराचा पाया खोदण्याआधी तेथील मातीचे परीक्षण सुरू आहे. त्याचा अहवाल येणे बाकी आहे. हे काम लार्सन अँड टुब्रो कंपनी करीत आहे.

Web Title: Bhumi Pujan of Ram Mandir in Ayodhya on 3rd or 5th August

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.