"माझा मुलगा असता तर बदला घेतला..." भाजपा नेत्याने कानाखाली मारल्यावर ढसाढसा रडले BEO
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 18:21 IST2025-07-15T18:21:03+5:302025-07-15T18:21:44+5:30
ब्लॉक शिक्षण अधिकारी राजवीर शर्मा यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये ते ढसाढसा रडताना दिसत आहेत.

"माझा मुलगा असता तर बदला घेतला..." भाजपा नेत्याने कानाखाली मारल्यावर ढसाढसा रडले BEO
मध्य प्रदेशच्या मेहगावमधील ब्लॉक शिक्षण अधिकारी राजवीर शर्मा यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये ते ढसाढसा रडताना दिसत आहेत. BEO शर्मा यांनी एका भाजपा नेत्याने त्यांना कानशिलात लगावली आणि २०,००० रुपये मागितले असा आरोप केला आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी ही घटना घडली. यामुळे शिक्षण विभागात संताप निर्माण झाला आहे आणि लोक प्रश्न उपस्थित करत आहेत.
गुरुपौर्णिमेच्या दिवशी, जेव्हा सरकार गुरुंचा सन्मान करत होते, तेव्हा भिंडमध्ये एक धक्कादायक घटना घडली. बीईओ राजवीर शर्मा यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये ते रडताना दिसत आहेत. त्यांनी आरोप केला आहे की, नीरज शर्मा यांनी त्यांना कानाखाली मारली. राजवीर शर्मा यांनी व्हिडिओमध्ये "भाजपा नेत्याने मला कानाखाली मारली. जर माझा मुलगा असता तर त्याने बदला घेतला असता" असं म्हटलं आहे.
भिंड के #मेहगांव में BJP मंडल अध्यक्ष नीरज शर्मा ने 20 हज़ार की रंगदारी नहीं देने पर BEO श्री राजवीर शर्मा को थप्पड़ मार दिया!
— MP Congress (@INCMP) July 13, 2025
इस शर्मनाक घटना से व्यथित श्री शर्मा की आँखें एक सम्मान समारोह में भर आईं और एक टूटे हुए इंसान की पीड़ा साफ़ झलक रही थी!
👉 @BJP4MP क्या अब शिक्षा… pic.twitter.com/0QaZT9yFlY
नीरज शर्मा त्यांच्याकडून २०,००० रुपये मागत होते असा आरोपही शर्मा यांनी केला. पैसे न दिल्याने भाजपा नेते संतापले. कानाखाली मारली आणि सार्वजनिकरित्या अपमान केला. या घटनेनंतर शिक्षण विभागात संतापाचं वातावरण आहे. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
मध्य प्रदेश काँग्रेसने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून व्हिडीओ शेअर करून सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. हा व्हिडीओ गुरुपौर्णिमेच्या दिवसाचा असल्याचं सांगितलं जात आहे. ज्या दिवशी राज्य सरकार संपूर्ण राज्यात गुरुंची पूजा करत होते, त्याच दिवशी भिंडमधील एका शिक्षण अधिकाऱ्याला अशी वागणूक देण्यात आली असं म्हणत टीका केली आहे.
आरोपांवर माध्यमांशी बोलताना भाजपा नेते नीरज शर्मा म्हणाले की, त्यांच्यावरील सर्व आरोप खोटे आहेत. मी बीईओच्या काही चुका पकडल्या होत्या. यानंतर, हे आरोप करण्यात आले आहेत. पक्षाने माझ्याकडून उत्तर मागितले आहे, मी लवकरच लेखी उत्तर देईन असं सांगितलं आहे.