भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 07:58 IST2025-09-28T07:57:47+5:302025-09-28T07:58:29+5:30
इंडिया तंत्रज्ञानात ‘AI’ वापरतो, तर भारत अजूनही वीजपुरवठ्यासाठी झगडतो. समाजातील ही आर्थिक दरी वाढत गेली, तर ग्रामीण-शहरी संघर्ष अटळ आहे.

भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
नंदकिशाेर पाटील
संपादक, छत्रपती संभाजीनगर
महाराष्ट्राच्या मातीत गेल्या काही दिवसांत एक परस्परविरोधी चित्र उभे ठाकले आहे. एकीकडे अतिवृष्टी, ढगफुटी आणि मुसळधार पावसामुळे खरीप पिकांचे, फळबागांचे, रस्त्यांचे आणि घरांचे झालेले प्रचंड नुकसान-शेतकऱ्यांच्या डोळ्यांत भविष्याची काळजी, तर दुसरीकडे मुंबई-पुण्यासारख्या शहरांत ॲपलच्या नव्या आयफोनसाठी तरुणाईची झुंबड. एक समाज निसर्गावर पूर्णतः अवलंबून; दुसरा जागतिकीकरणाच्या फळांचा उपभोग घेणारा. हीच ती “आहे रे आणि नाही रे वर्गातील दरी”, म्हणजेच भारत विरुद्ध इंडिया!
आयफोन खरेदी करणाऱ्या तरुणाईची झुंबड आणि नैसर्गिक आपत्तीत उद्ध्वस्त झालेला शेतकरी-ही तुलना विसंगत भासू शकते. आयटी क्षेत्रातील तंत्रज्ञ तरुणांनी बौद्धिक क्षमतेच्या जोरावर जग जिंकले, हे अभिमानाचेच आहे. पण लाखो तरुणांच्या हाताला आजही काम नाही. नोकऱ्यांचे दरवाजे बंद होत चाललेत, आरक्षणाच्या मोर्चांत वाढणारी गर्दी हा केवळ जातीय आग्रह नव्हे, तर रोजगाराच्या टंचाईतून आलेला उद्वेग आहे.
संविधानात ‘इंडिया इज भारत’ असे म्हटले आहे. दोन नावांची ही मांडणी आपल्याला एकात्मतेची शिकवण देते; परंतु वास्तवात आपण पाहतो ते वेगळेच चित्र आहे. देश दोन तुकड्यांत विभागल्यासारखा दिसतो. एक भाग म्हणजे ‘इंडिया’ जो आधुनिक, झपाट्याने प्रगती करणारा, जागतिक स्तरावर स्पर्धा करणारा आणि दुसरा भाग म्हणजे ‘भारत’; जो गरिबी, विषमता आणि वंचिततेशी झुंज देणारा. भारतातील अर्थव्यवस्था आज जगातील सर्वांत वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक मानली जाते. जीडीपी वाढीचे आकडे झगमगाट दाखवतात, परदेशी गुंतवणूक वाढते, नवे उद्योग उभे राहतात.
एकीकडे तंत्रज्ञान, अर्थव्यवस्था आणि शिक्षणात झपाट्याने प्रगती करणारा ‘इंडिया’, तर दुसरीकडे कष्टकरी, शेतकरी, मजूर आणि उपेक्षित वर्गांच्या संघर्षात अडकलेला भारत! शेअर बाजारात रोज नवे विक्रम नोंदवले जातात. शहरातील मॉल, मेट्रो, आलिशान सोसायट्या आणि स्टार्टअप्समध्ये ‘इंडिया’ तेजाने झळकतो; परंतु त्याच वेळी गावातल्या शेतकऱ्याला पिकाला भाव मिळत नाही, युवकांच्या हाताला काम नाही. इंडियातील काही टक्के लोकांच्या हातात प्रचंड संपत्ती; जागतिक दर्जाचे उद्योगपती, डॉलर अब्जाधीशांची संख्या वाढते आहे, तर भारतातील अर्ध्याहून अधिक लोक अजूनही पोटापाण्यासाठी धडपडत आहेत. ग्रामीण अर्थव्यवस्था निसर्गाच्या चक्रात अडकली आहे.
‘इंडिया’तील उच्चवर्गीय समाजाची जीवनशैली पाश्चिमात्य जगाशी स्पर्धा करणारी आहे. मॉल, मल्टिप्लेक्स, डिजिटल पेमेंट, परदेश प्रवास ही रोजची गोष्ट; परंतु ‘भारत’ अजूनही पायाभूत सुविधांपासून वंचित आहे. गावात अजून रस्ते नाहीत, पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे, आरोग्यसेवा पोहोचत नाही. ही विषमता फक्त आर्थिक नाही, तर सामाजिक स्तरही दर्शविते. शिक्षण हा समाज परिवर्तनाचा पाया आहे. पण इथेही “भारत विरुद्ध इंडिया” हेच चित्र आहे. इंडियातील विद्यार्थी इंग्रजी माध्यमांच्या शाळेत, आंतरराष्ट्रीय शाळेत, आयआयटी-आयआयएम, परदेशी विद्यापीठांची स्वप्नं पाहाणारे, तर ग्रामीण भारतातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक नाहीत, साधने नाहीत. इंडिया तंत्रज्ञानात ‘AI’ वापरतो, तर भारत अजूनही वीजपुरवठ्यासाठी झगडतो. समाजातील ही आर्थिक दरी वाढत गेली, तर ग्रामीण-शहरी संघर्ष अटळ आहे.
इंडियाची ‘ब्रँडेड’ धावपळ
भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा स्मार्टफोन बाजार आहे. २०२४ मध्ये ॲपलने भारतात ८५ लाख आयफोनची विक्री केली. ॲपलची भारतातील विक्री जवळपास ९ अब्ज डॉलर्सच्या विक्रमी पातळीवर पोहोचली आहे.
भारतातील चित्र
ग्रामीण भागातील ७ कोटी घरे विना शौचालय, २० कोटी लोक अजूनही दारिद्र्यरेषेखाली तर, बेरोजगारांची संख्या ८ कोटींवर पोहोचली आहे.