कोलकाता : भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदारयाद्यांत फेरफार करून लोकांचा मतदानाचा हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शनिवारी केला.
कोलकाता येथील रेड रोडवर ईदच्या नमाजानंतर हजारोंच्या जनसमुदायासमोर बोलताना तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख बॅनर्जी यांनी आरोप केला की, मतदारयाद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण म्हणजे राज्यांतील निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करण्याच्या प्रयत्नाचा एक भाग आहे. एसआयआरमध्ये मोठ्या प्रमाणावर मतदारांची नावे वगळण्यात आली असल्याचा तृणमूल काँग्रेसचा आरोप आहे. बॅनर्जी म्हणाल्या की, एसआयआरच्या नावाखाली मतदारांना मतदानाच्या हक्कापासून वंचित ठेवण्याच्या कोणत्याही प्रयत्नाला तृणमूल काँग्रेस पक्ष विरोध करेल. बंगालला लक्ष्य करून सत्ताधारी फूट पाडण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
बंगालचा एकतेवर विश्वास...
बंगालचा एकतेवर विश्वास आहे. येथे सर्व धर्माचे लोक एकत्र राहतात. ही सामाजिक वीण आम्ही कुणालाही तोडू देणार नाही. यंदा तृणमूल काँग्रेस सलग चौथ्यांदा सत्ता मिळविण्याच्या तर भाजप २०१९ची लोकसभा निवडणूक आणि २०२१च्या विधानसभा निवडणुकीत मिळविलेली आघाडी अधिक विस्तारित करण्याच्या प्रयत्नात आहे.
मतदान यंत्र वाटपाचा पहिला टप्पा यशस्वी
नवी दिल्ली : आसाम, केरळ व पुड्डुचेरीत ९ एप्रिल रोजी होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत वापरात येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन (ईव्हीएम) व व्हीव्हीपॅट यादृश्चिक (रँडम) पद्धतीने वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर पाठवण्याचा पहिला टप्पा शनिवारी पूर्ण करण्यात आला. ईव्हीएम तसेच व्हीव्हीपॅट मशीनचे वितरण दोन टप्प्यांत होते. पहिल्या टप्प्यात विविध जिल्ह्यांच्या ठिकाणी मतदानयंत्रे पाठवली जातात. तेथून संबंधित मतदान केंद्रांवर याच पद्धतीने वितरण होते. याच पद्धतीने गोवा, कर्नाटक, नागालँड व त्रिपुरात होत असलेल्या पोटनिवडणुकीसाठीही ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
काँग्रेस ही भाजपची ‘बी-टीम’ : विजयन
तिरुवनंतपुरम : केरळचे मुख्यमंत्री पिनारयी विजयन यांनी शनिवारी काँग्रेसला लक्ष्य केले. काँग्रेस व पक्षाचे नेते राहुल गांधी हे भाजपची बी-टीम असल्याचा आरोप त्यांनी केला. राहुल गांधी यांनी अशातच केरळच्या मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करून म्हटले होते की, केंद्रीय यंत्रणांनी केरळचे मुख्यमंत्री वगळता इतर सर्व विरोधी नेत्यांना अटक केली किंवा चौकशीसाठी बोलावले आहे. याबाबत विचारले असता माकप नेते विजयन यांनी काँग्रेस नेते आणि हा पक्ष भाजपची बी-टीम म्हणून काम करीत असल्याचा आरोप केला. शबरीमाला येथील हरवलेल्या सोन्याच्या मुद्द्यावर विजयन म्हणाले, केरळ उच्च न्यायालय या प्रकरणाच्या तपासावर देखरेख करीत आहे.
केरळ, पुदुचेरीसाठी भाजप उमेदवार जाहीर
नवी दिल्ली : केरळ व पुदुचेरी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आणखी अनुक्रमे ११ व ९ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. केरळमध्ये पक्षाचे जिल्हाध्यक्ष करमना जयन यांना तिरुवनंतपुरम या महत्त्वाच्या मतदारसंघातून मैदानात उतरविण्यात आले आहे. भाजपने केरळसाठी आतापर्यंत ९७ उमेदवारांची घोषणा केली असून, येथे पक्षाला प्रामुख्याने डाव्या आघाडीचे मोठे आव्हान आहे. पुदुचेरीत शनिवारी भाजपने ९ उमेदवारांची यादी जाहीर केली. या ठिकाणी सत्ताधारी ऑल इंडिया एनआर काँग्रेस आणि भाजप-अण्णाद्रमुक आघाडी एकत्रितपणे लढत असून, एनआयएनआरसी १६ तर भाजप व इतर १४ जागा लढवणार आहेत.
तामिळनाडूत अण्णाद्रमुकला मोठा वाटा मिळणार
चेन्नई : तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास नऊ दिवस शिल्लक असताना अण्णाद्रमुकच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीतील जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असून, अण्णाद्रमुक सुमारे १७० जागा आपल्याकडे ठेवण्याची शक्यता आहे. पक्षाचे सरचिटणीस ए. के. पलानीस्वामी यांनी १९ मार्च रोजी दिल्लीत भाजप नेत्यांशी याबाबत केलेल्या चर्चेनंतर हे संख्याबळ निश्चित झाले असून, राज्यातील २३४ विधानसभा मतदारसंघांपैकी अण्णाद्रमुक सुमारे १६० ते १७० जागा राखण्याची शक्यता आहे. राज्यात बहुमतांसाठी ११८ जागांची आवश्यकता आहे. पलानीस्वामी यांनी २१० जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले असून, तेच आघाडीच्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा आहेत.
Web Summary : Mamata Banerjee accuses BJP of voter suppression before elections. She vowed to resist any attempt to disenfranchise voters in Bengal. Other news includes election updates from Assam, Kerala, Puducherry, and Tamil Nadu, along with accusations against Congress.
Web Summary : ममता बनर्जी ने भाजपा पर चुनाव से पहले मतदाता दमन का आरोप लगाया। उन्होंने बंगाल में मतदाताओं को मताधिकार से वंचित करने के किसी भी प्रयास का विरोध करने की कसम खाई। अन्य खबरों में असम, केरल, पुडुचेरी और तमिलनाडु से चुनाव अपडेट शामिल हैं, साथ ही कांग्रेस पर आरोप भी हैं।